‘कोण होणार करोडपती’या कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि अचूक उत्तरं देऊन आपलं नशिब आजमावलं. या मंचावर येऊन अनेकांनी आपल्या जवळील व्यक्तीची इच्छा व्यक्त केली आणि होस्ट नागराज यांनी सुध्दा खेळाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत आपले पणाने संवाद साधला. स्पर्धकांच्या या हक्काच्या मंचावर आता कर्मवीरांची ओळख महाराष्ट्राशी होणार आहे. या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ असणार आहे. यामध्ये अशा व्यक्तींचा सहभाग असेल ज्यांनी समाजाच्या हिताच्या विचाराला सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्यासाठी कार्य केले आहे. आणि कर्मवीर स्पेशलच्या पहिल्या एपिसोडमध्ये अधिक कदम उपस्थित राहणार आहेत.
अधिक कदम यांनी ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेअंतर्गत त्यांनी दहशतग्रस्त असणा-या मुलींच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय केली. हा कार्यक्रम नेहमी एक गोष्ट सांगून प्रेरित करत असतो की ‘उत्तरं शोधलं की जगणं बदलतं’, पण अधिक कदम यांनी त्यांच्या आयुष्यातील उत्तरं शोधून स्वत:चं जगणं तर बदललंच आहे पण त्याचबरोबर इतरांची पण जगणं बदलून त्यांची आयुष्यं सुरक्षित केली आहेत.