सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत.
या कार्यक्रमात यंदा बक्षिसाची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. पण, या दुप्पट रकमेसह एक आगळावेगळा ट्विस्ट देखील प्रेक्षक आणि स्पर्धकांना पाहायला मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती'चा येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या वेळी बोलताना 'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालक, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, 'आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्याफार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो, तेव्हा मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बरं चाललंय ना, अशी माझीही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं. मला नेहमी वाटतं की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करून आलेलेच असतात, पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर.'