बिग बॉस मराठीचा नवीन सीझन रविवारी २८ जुलैपासून सुरु झालाय. रितेश देशमुख या सीझनचं होस्टिंग करत आहे. ग्रँड प्रिमियरला घरात एकामागून एक स्पर्धकांची एन्ट्री झाली. यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं ते परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या इरिना रुडाकोव्हाने. इरिनाने बिग बॉस मराठीमध्ये प्रवेश करताच तोडक्यामोडक्या मराठी भाषेत रितेश देशमुखशी संवाद साधला. कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या अंकिता प्रभू-वालावलकरने याबद्दल तिचं मत व्यक्त केलंय.
परदेशी मॉडेलला बघताच अंकिता काय म्हणाली?
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पहिल्याच दिवशी परदेशी मॉडेल इरिनाची एन्ट्री झाली. पहिल्याच दिवशी इरिनाला घरातील सदस्य मराठी शिकवत होते. 'तुला काय अडलं तर विचारत जा', असं तिला म्हणत होते. त्यानंतर अंकिता वालावलकर बाजूला एकटीच निघून गेली. पुढे ती म्हणाली, पहिलाच दिवस आहे. सगळेच इंग्लिशमधून तिला एक्सप्लेन करत आहेत. मराठी शिकवण्यासाठी तिला इथे पाठवलंय. तिला आम्ही मराठी शिकवावं.
भाषेचा प्रॉब्लेम नाही पण...: अंकिता
अंकिता पुढे म्हणाली, "मला भाषेचा प्रॉब्लेम नाहीय. भाषा सगळ्यांना सगळ्या आल्या पाहिजेत. पण जेव्हा आपण एखादा मराठी शो म्हणतोय तेव्हा एका मराठी कलाकाराची जागा गेलीय असं मला वाटतं." अशाप्रकारे अंकिता प्रभू-वालावलकरने इरिनाबद्दल तिचं मत व्यक्त केलं. आता परदेशी कलाकार असूनही इरिना मराठी कसं शिकणार याशिवाय घरातील सदस्य तिला सांभाळून घेणार का, हे पुढील भागांमध्ये कळून येईल.