Ankita Walawalkar: 'कोकण हार्टेड गर्ल 'या नावाने प्रसिद्ध असणारी सोशल मीडियास्टार, 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) अलिकडेच लग्नबंधनात अडकली. अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. १६ फेब्रुवारीला कोकणातील देवबाग येथे अत्यंत पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. सध्या तिच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता लग्नानंतर अंकिता तिच्या सासरच्या घरी पोहोचली आहे. नुकताच अंकिताने तिच्या सासरी गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल'ने सासरच्या घराची संपूर्ण झलक पाहायला मिळते.
दरम्यान, अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिताच्या सासरच्या मंडळींनी लाडक्या सूनेच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. कुणाल भगतच्या घरच्यांनी नव्या सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. कोकणातील परंपरेनुसार अंकिताचा त्यांच्या घरी गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी दोघांनी सुंदर उखाणे देखील घेतले. "माणगावच्या घरी गृहप्रवेश..." असं कॅप्शन देत अंकिताने हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या व्हिडीओ गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना अंकिता म्हणाली, "समुद्रकिनारी जुळल्या गाठी, कुणालचं नाव घेते साताजन्मासाठी...". यानंतर कुणाल उखाणा घेत म्हणाला, "सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी" या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला त्यांनी अंकिताच्या अल्बमधील 'लग्नसराई' हे गाणं लावलं आलं आहे.