अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी)चे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबई क्रुज ड्रग्स केस प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यनसह काही जणांना ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान समीर वानखेडे यांनी अलिकडेच झी मराठीवर गाजत असलेल्या अवधुत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्त या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात समीर वानखेडे यांनी अवधूत गुप्तेच्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली. अगदी प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत.
यावेळी क्रांतीला समीर वानखेडे यांच्याबाबत खुपणारी गोष्ट विचाराली, यावर ती म्हणाली, दूरच्या प्रवासाला जाताना समीर मध्ये कुठेही गाडी थांबवत नाही. एका गाडीत बसलो की, गाडी थेट तिथेच थांबते जिथे जायचं असतं. भूक लागली तरी गाडी थांबत नाही.
क्रांतीने या दरम्यान लग्नानंतरचा एक किस्सा देखील सांगितला, म्हणाली, आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी गाडी चालवत होते. मी चुकून गाडी वनवेमध्ये घातली आणि तिकडे पोलीस उभे होते. मी समीरला फोन केला की गाडी चुकून वनवेमध्ये घातली, मला बोर्ड दिसला नाही. समोर पोलीस आहेत. मी सगळं त्याला सांगितलं. यावर समीर मला म्हणाला. काय झालंय नक्की. किती दंड आहे ? जो असेल तो भर आणि जा तिथू. असल्या फालतू गोष्टींसाठी मला फोन करायचा नाही. क्रांती म्हणाली त्यानंतर मी आजपर्यंत कधीच नियम मोडलेला नाही.
हा किस्सा क्रांतीनं सांगितल्यावर समीर म्हणाले, आपल्या देशात कायदे आहेत. चुकीच्या रस्त्यानं गाडी चालवली, सिग्नल मोडला...हा काय गुन्हा नसला तरी नियमांचं उल्लंघन होतं.अशा गोष्टींसाठी माझा नवरा मोठा अधिकारी आहे हे सांगणं मला पटत नाही, योग्य वाटत नाही.