Join us

कृष्णाच्या भूमिकेत दिसलेला हा अभिनेता आज करतोय हे काम, वाचून तुम्हाला देखील वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 7:00 AM

श्रीकृष्ण या मालिकेत कृष्णाची मुख्य भूमिका सर्वदमन बॅनर्जी यांनी साकारली होती.

ठळक मुद्देसर्वदमन आता काय करतात हे वाचले तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ते सध्या ऋषिकेशमध्ये राहात असून तिथे ते लोकांना मेडिटेशनचे धडे देतात. त्यांनी काही वर्षांपासून चित्रपट, मालिकांमध्ये काम करणे खूपच कमी केले आहे.

सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने दूरदर्शनवर महाभारत आणि रामायण या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका पुन्हा एकदा दाखवल्या जात आहेत. या मालिकानंतर रामानंद सागर यांची कृष्णा ही मालिका पुन्हा एकदा दाखलली जावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी केली होती. आता प्रेक्षकांच्या या मागणीचा मान राखत कृष्णा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

श्रीकृष्ण या मालिकेत कृष्णाची मुख्य भूमिका सर्वदमन बॅनर्जी यांनी साकारली होती. या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा हा अभिनेता आता काय करतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. श्रीकृष्ण ही मालिका प्रेक्षकांना 1993 ते 1996 च्या दरम्यान पाहायला मिळाली होती. या मालिकेमुळे सर्वदमन यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील भूमिकेचा त्यांना इतका फायदा झाला होता की, त्यांना त्या काळात अनेक मालिकांच्या ऑफर मिळाल्या. त्यानंतर अर्जन, जय गंगा मैय्या, ओम नमः शिवाय या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. पण या सगळ्याच मालिकांमध्ये ते श्रीकृष्ण अथवा विष्णूच्या भूमिकेत दिसले.

सर्वदमन यांनी मालिकांसोबत स्वामी विवेकानंद, आदि शंकराचार्य यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ते काही बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्ये झळकले. एवढेच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या एमएस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते. 

सर्वदमन आता काय करतात हे वाचले तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ते सध्या ऋषिकेशमध्ये राहात असून तिथे ते लोकांना मेडिटेशनचे धडे देतात. त्यांनी काही वर्षांपासून चित्रपट, मालिकांमध्ये काम करणे खूपच कमी केले आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी गेल्या २० वर्षांपासून मेडिटेशनचे धडे लोकांना देत आहे. त्यामुळे मी अभिनयक्षेत्रापासून दूर आहे आणि तसेही मी वयाच्या 45-47 वर्षांपर्यंतच या क्षेत्रात काम करायचे असे मी आधीच ठरवले होते.  

टॅग्स :टेलिव्हिजन