एकता कपूरची (ekta kapoor) सुपरहिट ठरलेली मालिका म्हणजे 'क्यूँकी सांस भी कभी बहू थी'. या मालिकेने छोट्या पडद्यावर जणू राज्यच केलं होतं. या मालिकेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) प्रकाशझोतात आल्या होत्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसी ही भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. परंतु, लोकप्रिय झालेली ही भूमिका स्मृती इराणी यांनी नाइलाजाने केली होती. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं.
"त्यावेळी मी मॅकडॉनल्ड्समध्ये १८०० रुपये प्रती महिना पगारावर काम करायचे. त्याकाळात काही कामानिमित्त मी एकता कपूरची भेट घेतली होती. तेव्हा तिथे एकतासोबत तिचे ज्योतिषदेखील बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हिच्यासोबत काम कर. बघ एक दिवस ही टेलिव्हिजनवरची लोकप्रिय अभिनेत्री होईल, असं एकताला सांगितलं. एकतानेही तिच्या ज्योतिषांचं ऐकलं आणि तुलसीसाठी माझी निवड केली", असं स्मृती म्हणाल्या.
पुढे त्या सांगतात, "मला माझ्या पर्सनालिटीमुळे ही भूमिका मिळाली नाही. तर एकताच्या त्या ज्योतिषांमुळे मिळाली. त्याकाळी मी एका महिन्याचे १८०० रुपये कमवायचे आणि तुलसीच्या भूमिकेसाठी मला दिवसाला १८०० रुपये मिळणार होते. यापेक्षा मला आणखी काय हवं होतं? त्यावेळी मी मॅकडॉनल्ड्समध्ये सफाई कर्मचाऱ्याचं काम करायचे. माझ्याकडे ठोस अशी नोकरी नव्हती. त्यामुळे वयाच्या २३ व्या वर्षी महिन्याला १८०० रुपये पगारावर काम करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता."
दरम्यान, या मालिकेतील स्मृती इराणी यांची तुलसी वीरानी ही भूमिका प्रचंड गाजली. इतकंच नाही तर त्या मालिकेचा चेहरा झाल्या. त्यामुळेच आजही त्या या भूमिकेमुळे बऱ्याचदा चर्चेत येतात.