सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवर ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ (Kuch Reet Jagat Ki Aisi Hai) ही नवीन मालिका दाखल होत आहे. या वेधक मालिकेत एक घरगुती, उत्साही आणि जबाबदार नंदिनी आपल्या देशात रुजलेल्या हुंडा प्रथेला आव्हान देताना दिसते. परंपरेचा मुलामा चढवलेला हुंडा म्हणजे एका स्त्रीच्या प्रतिष्ठेची किंमत असते आणि ‘मला माझा हुंडा परत हवा आहे’ ही नंदिनीची निर्भीड मागणी या मालिकेचे कथानक पुढे घेऊन जाते. ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेच्या केंद्रस्थानी नंदिनी आहे, जी साकारली आहे मीरा देवस्थळे या अभिनेत्रीने. ही व्यक्तिरेखा ताकदीचे प्रतीक आहे आणि स्त्रीचा आत्मसन्मान पणाला लावणाऱ्या जुनाट हुंडा प्रथेला आव्हान देणारी ही नायिका आहे.
गुजरात प्रांतात घडणाऱ्या या कथेत नंदिनीचे पालनपोषण तिच्या मामा-मामीने केले आहे, ज्यांच्या भूमिका अनुक्रमे जगत रावत आणि सेजल झा यांनी केल्या आहेत. नंदिनी परंपरेची बूज राखणारी आहे, ती वाडीलधाऱ्यांना मान देते, ती बहुश्रुत आहे आणि पुरोगामी विचारांची आहे. आपल्याला जे समजले नाही, त्याबद्दल प्रश्न विचारण्याची शिकवण तिच्या मामाने तिला दिली आहे आणि ते ती बेधडकपणे वापरते.
अभिनेता झान खान याने नंदिनीचा पती, नरेन रतनशी याची भूमिका केली आहे, तर अभिनेता धर्मेश व्यास आणि खुशी राजपूत यांनी अनुक्रमे हेमराज रतनशी आणि चंचल रतनशी या तिच्या सासऱ्याची आणि सासूची भूमिका केली आहे. समाधानी वैवाहिक जीवन लाभलेली नंदिनी आपल्या सासू-सासऱ्यांच्या आणि हुंडा प्रथेच्या विरोधात हिंमतीने उभी ठाकते आणि यातून एक दृढनिर्धाराची, लवचिकतेची आणि सामर्थ्याची हृदयस्पर्शी कथा जन्म घेते.‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिका १९ फेब्रुवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता ती प्रसारित होणार आहे.