कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लयुन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) हिने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) १६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणात मालवणमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता तिच्यासाठी तिच्या नवऱ्याने गायलेल्या गाण्याचा अल्बम समोर आला आहे.
अंकिता वालावलकर हिने इंस्टाग्रामवर कोकणची परी या अल्बमचे पोस्टर शेअर केले आहे. यात ती आणि कुणाल समुद्रकिनारी हातात हात घेऊन चालताना दिसत आहेत. यावेळी अंकिताने नारंगी रंगाचा ड्रेस घातला आहे. तर कुणालने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्राउन रंगाची पॅण्ट परिधान केलेली दिसत आहे. तिने पोस्टर शेअर करत लिहिले की, माझ्यासाठी कुणालने खूप गाणी गायलीत आणि लिहिली सुद्धा…तो फार कॅमेरासमोर कधी आला नाही आत्ता मी त्रास देऊन त्याला कॅमेरा समोर आणते..त्याला सहज बोलले होते की एक गाणं तू गा असं की जे लोक मला भेटले की ते गाणं वापरू शकतील स्टोरी ठेऊ शकतील..आणि अचानक लग्नाच्या काही दिवस आधी हे गाणं कुणाल ने ऐकवलं जे तो स्वतः गायलाय…अर्थात मी गाऊ शकत नसल्याने माझ्या भावना सावनी रविंद्रने गायल्यात… लेकीन गा वो राही है शब्द हमारे है.
अंकिता आणि कुणालची लव्हस्टोरीही खूपच हटके आहे. अंकिता ही सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर, अभिनेत्री आहे. अंकिता आणि कुणालची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली. झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये अंकिता होस्टिंग करत होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता दोघांनी संसार थाटलाय. अंकिता सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. मात्र तिला 'बिग बॉस मराठी ५' खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता ही एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याने आजवर अनेक गाण्यांचे दिग्दर्शन केले आहे.