'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) ही जोडी जबरदस्तच आहे. जसे हे पडद्यावर मनोरंजन करतात तसंच खऱ्या आयुष्यातही अशाच गंमतीजमती करतात. याचाच प्रत्यय कुशलच्या नव्या व्हिडिओमधून आलाय. कुशल आणि भाऊ दोघंही काम संपल्यावर एकत्रच घरी जात असताना कारमध्ये भाऊ कदमने कुशलचा हा व्हिडिओ शूट केला आहे.
अनेकदा रात्री अपरात्री पॅकअप झाल्यावर कुशल आणि भाऊ एकत्रच घरी जातात. तेव्हा स्वाभाविक आहे दोन विनोदवीर एकत्र असताना धमाल मस्ती तर होणारच. कुशलने एक व्हिडिओ शेअर केला असून त्याने एक शेर म्हटला आहे. 'ये दुनिया बडी जालीम है हर राज छुपाना पडता है, दिल में कितना ही गम हो, महफिल में मुस्कुराना पडता हैं'.
याला कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'भाऊ कदम आणि मी बऱ्याचदा आमच्या दोघांचीच मैफल रंगते. तशी आमच्या मैत्रीला बरीच वर्ष झाली पण आजही आमचा प्रवास एकत्रच होतो. रात्री 3/4 ला packup करुन निघाल्यानंतर प्रवासात भाऊ आणि माझी मैफिल सुरू होते सोबतीला कधी गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब कधी पंकज उदास कधी जगजीत सिंगजी कधी हरिहरन कधी लता ताई कधी साब्री ब्रदर्स अशी असंख्य दिग्गज आमच्या सोबत गाडीत असतात…. काल मात्र रात्री 4:30 ला शेरो-शायरीची बैठक बसली वीर गुर्जर साहेबां सोबत. त्याची ही छोटीशी झलक'
हे वीर गुर्जर साहेब कोण असा प्रश्न शायरी ऐकून पडतो. तेव्हा कळतं की कुशल समोर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे लिहिलेला शेर वाचत असतो.'काय पाठांतर आहे रे तुझं' असं भाऊ कदम त्याला म्हणतो आणि कॅमेरा फिरवतो. त्यावर वीर गुर्जर यांचं नाव असतं आणि खाली या दोन ओळी असतात. हा व्हिडिओ पाहून चाहते पोट धरुन हसले आहेत. शायरी कोणाचीही असो पण कुशलने कडक स्टाईलमध्ये म्हटली आहे.