कोरोनाशी चार हात करण्यासाठी आणि आपल्या देशातून कोरोनाला पळवून लावण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. देशातील तमाम डॉक्टर, परिचारिका, पोलीस, प्रशासन या सर्वांचा प्रयत्नांना यश येण्यासाठी सर्व दिग्गज नेते, कलाकार मंडळी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहे. त्यात ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके याने आणि त्याच्या कुटुंबियांनी खारीचा वाटा उचलत या जनजागृतीत सहभाग घेतला आहे. आता कुशलने कोरोनावरच्या संकटावरचे सुंदर गाणे शेअर केले आहे.
माझ्या आयुष्याशी निगडीत एक छोटी गोष्ट शेअर करतोय... असे सांगत कुशलने घरातील एका सुंदर मैफिलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘नाटक, गाण, सामाजिक जाणिवा या गोष्टी मला मिळाल्या त्या माझ्या आईच्या घरातून म्हणजेच माझ्या मामांकडून (अरुण मोहिते) ज्यांनी माझ बालपण सम्रुद्ध करुन टाकल, आमच्या बालपणी मोठ्यामामांनी पेटी काढली की जी काही मैफिल जमायची... तिची सर मला आजपर्यंत कोणत्याच मैफिलीला आली नाही, तसे माझे सगळेच हट्ट त्यांनी पुरवले त्यातलाच हा एक...’, असे हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे. सोबत, कोरोनावरच्या संकटावर ह्यापेक्षा सुंदर गाण होऊच शकत नाही अशी मला खात्री आहे, असेही त्याने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी कुशलने आपल्या कुटूंबियांसोबत भारूडाच्या माध्यमातून कोरोनाबद्दल जनजागृती केली होती. शिवाय गो कोरिनिया या गाण्याचा व्हिडीओही शेअर केला होता. त्याचे हे गाणेही सोशल मीडियावर तुफान गाजले होते. या गाण्यामधून त्याने कोरोना विषाणू कसा रोखायचा, काय काळजी घ्यायची हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.