कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात.
नुकतंच कुशलने त्याच्या मुलांविषयी पोस्ट करत बालपणीच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत. कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन मुलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा एक मुलगा खिडकीत गिटार घेऊन बसल्याचं दिसत आहे. तर दुसरा पेंटिंग करत असल्याचं दिसत आहे. "ही माझी मुलं. ह्यांना कधीही, काहीही होता येतं. आज एकजण “ Rockstar” झालाय, तर एकजण “painter”. तसं ही दोघं रोज कोण ना कोण होत असतात. ह्यांच्यामुळ ते Messi, Ronaldo, Spiderman, पुष्पा, पुष्पराज वगैरे मंडळी तर माझ्या घरी पडीक असतात", असं कुशलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "तुम्हाला सांगू...आपल्या सगळ्यांच्या जगापल्याड, ह्या मुलांची एक दुनिया आहे...“अतर्काची दुनिया”. ज्यात काळ-वेळेचं गणित नाही की unnecessary चे logics नाहीत. जिथे “sorry” म्हटलं की विषय संपतो. कट्टीपासून सुरू झालेली लढाई, बट्टी म्हटलं की संपते आणि मैत्री आधीपेक्षा घट्ट होते. आई रक्ताची शप्पथ ही लक्ष्मण रेषेपेक्षा डेंजर असते ती कधीच ओलांडता येत नाही . मला एवढच वाटतं की आज लहानपणी त्यांना वाट्टेल ते होता येतंय, मोठे झाल्यावर ते कोण होतील माहीत नाही पण त्यांना “लहान मूल” होता आलं पाहिजे . बास!!".