आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. नेहमी हसत खेळत राहणारा आणि इतरांनाही हसायला भाग पाडणारा कुशल काही वेळेस तितकंच भावूकही करुन जातो. याचा प्रत्यय त्याच्या सोशल मीडियावरील कॅप्शनमधून येत असतो. कुशलची बायको सुनयना नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला निघाली आहे. आता काही दिवस ती घरात नसणार म्हणल्यावर कुशलने बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
कुशल बद्रिकेची बायको सुनयना 'मुघल ए आजम' या महानाट्यात काम करत आहे. सुनयनाने कथ्थकचे प्रशिक्षण घेतलं आहे. नाटकाचे प्रयोग आता अमेरिकेत होणार असल्याने सुनयनाही अमेरिकेला रवाना झाली आहे. तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुशल आणि मुलं आली आहेत. ते फोटो पोस्ट करत कुशलने छानसं कॅप्शन दिलं आहे.
तो लिहितो,"यार सुनयना,तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार...जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा”खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस.बाकी तू परत येशील तेंव्हां…..हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेलकाय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….आणि मी………..मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून)
तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार आणि मुघलांनी अमेरिकेवर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा.
'मुघल ए आजम' हे संगीतमय नाटक आहे. फिरोज अब्बास यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री आणि गायिका प्रियंका बर्वे अनारकलीच्या भूमिकेत आहे.