अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनाच्या धक्क्यातून टीव्ही इंडस्ट्री अद्यापही सावरलेली नाही. गत 26 डिसेंबरला कुशलने वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबादार ठरवू नये, असे आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले होते. आता कुशलच्या वडिलांनी लेकाच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री नेमके काय घडले होते, याबाबतचा खुलासा केला आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत कुशल अगदी ठीक होता. त्याच्या वडिलांनी सांगितले की, कुशल आदल्या रात्रीपर्यंत ठीक होता. त्याने माझ्यासोबत रात्रीचे जेवण घेतले. आम्ही खूपवेळ गप्पाही मारल्या. नेहमीप्रमाणे रोजच्या विषयांवर आम्ही बोललो. काही दिवसांपूर्वी सर्किट रेस दरम्यान कुशल जखमी झाला होता आणि येत्या काही दिवसातच त्याच्या खांद्याची सर्जरी होणार होती. त्यामुळे त्याला खांद्याची हालचाल करण्यास मनाई करण्यात आली होती.
कुशलच्या मित्रांचे मानाल तर वैवाहिक आयुष्यातील कलहामुळे कुशल डिप्रेशनमध्ये होता. कुशल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद विकोपाला पोहोचले होते. गत 3 वर्षांपासून दोघेही वेगवेगळे राहत होते. कुशल मुंबईत राहत होता. तर त्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन शंघाईला राहत होती. पण कुशलला वाद संपवून पुन्हा एकदा पत्नी व मुलासोबत राहायचे होते. कदाचित म्हणूनच आत्महत्या करण्यापूर्वी नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी कुशल पत्नी आणि मुलाला भेटण्याला शंघाई येथे गेला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार कुशल त्याच्या पत्नीशी बोलण्यासाठी आणि त्याच्या नात्याला एक संधी देण्यासाठी शंघाईला गेला होता. मात्र त्याच्या पत्नीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कुशलने ही गोष्ट त्याच्या मित्रांपासून लपवली होती. त्याने फक्त मुलगा कियानला भेटायला गेल्याचे मित्रांना सांगितले होते. 4 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने ऑड्रे डोल्हन हिच्यासोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगा आहे. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती.