अभिनेता कुशल पंजाबीने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी कुशलवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुस-या दिवशी शोकसभा आयोजित करण्यात आली. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी या शोकसभेला उपस्थिती लावली. कुशलची पत्नी ऑड्रे डोलन सुद्धा यावेळी दिसली. पण यावेळी मीडियापासून ती आपला चेहरा लपवताना दिसली. कुशलचा मुलगा तिच्यासोबत नव्हता. पतीच्या आत्महत्येची बातमी कळताच ऑड्रे शांघायवरून मुंबईत पोहोचली होती. पतीच्या अंत्यदर्शनाला आणि पाठोपाठ शोकसभेला ती पोहोचली. कुशल आणि ऑड्रे दीर्घकाळापासून विभक्त राहत होते.
कुशलच्या जवळच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, कुशल आणि त्याची पत्नी यांच्यात टोकाचे मतभेद होते. दोघांचे लग्न मोडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे कुशल नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने स्वत:ला संपवले. कुशल आर्थिक तंगीत असल्याचेही काही रिपोर्टमध्ये म्हटले होते.
२०१५ मध्ये त्याने यूरोपियन गर्लफ्रेन्ड ऑड्रे डोलनसोबत लग्न केले होते. २०१६ मध्ये दोघांना मुलगा झाला. मात्र कालांतराने दोघांमध्ये वाद होऊ लागलेत आणि कुशलची पत्नी मुलाला घेऊन शांघायला निघून गेली. कुशल मुलावर अपार प्रेम करायचा. मुलासोबतचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. अगदी मृत्यूच्या काही तासांपूर्वीही मुलासोबतचा एक फोटो त्याने पोस्ट केला होता.
कुशलला वाद संपवून पुन्हा एकदा पत्नी व मुलासोबत राहायचे होते. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी कुशल पत्नी आणि मुलाला भेटण्याला शांघायला गेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार कुशल त्याच्या पत्नीशी बोलण्यासाठी आणि त्याच्या नात्याला एक संधी देण्यासाठी शंघाईला गेला होता. मात्र त्याच्या पत्नीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कुशलने ही गोष्ट त्याच्या मित्रांपासून लपवली होती. त्याने फक्त मुलगा कियानला भेटायला गेल्याचे मित्रांना सांगितले होते.