अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येने सर्वांनाचा धक्का बसला. गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या कुशलने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार ठरवण्यात येऊ नये, असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते. पण तरीही त्याच्या आत्महत्येसाठी कुशलच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या कारणीभूत असल्याचे म्हटले गेले होते. पत्नी ऑड्रे डोल्हेन हिच्यासोबतच्या वादामुळे त्याने आयुष्य संपवल्याचेही मानले गेले होते.
कुशलला पत्नी आणि मुलासोबत राहायचे होते. मृत्यूच्या काही दिवसांआधी तो पत्नीला भेटायला शांघायला गेला होता. पण पत्नीने त्याला भेटण्यास नकार दिला, अशी माहितीही समोर आली होती. पण या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुशलची पत्नी ऑड्रेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती. पिपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, कुशलच्या आत्महत्येनंतर माझ्यावर का टीका होतेय हे मला कळत नाहीये. आमच्या नात्यात कुशल अपयशी ठरला होता. त्याला कुटुंबाचे गांभीर्य कळले नव्हते. एक वडील म्हणूनही तो निष्काळजीपणाने वागत होता. मुलाच्या भविष्याचा त्याने कधीच विचार केला नाही. मी कियानला (कुशल आणि ऑड्रेचा मुलगा) कधीच त्याच्याशी बोलण्यापासून थांबवले नव्हते.अनेकदा मी कुशलला शांघायला येऊन आमच्यासोबत राहाण्याबद्दल म्हटले होते. पण त्याची इच्छा नव्हती. मीच कुशालचा खर्च सांभाळत होते. मी माझ्या परीने हे नाते वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तरीही त्याच्या आत्महत्येसाठी मला जबाबदार ठरवले जातेय.
ऑड्रे डोल्हेनच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता तिने तिचे हे वक्तव्य बदलले आहे. कुशलच्या कुटुंबियांकडून एक निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन त्याच्या आई वडिलांसोबत त्याच्या पत्नीकडून देखील देण्यात आलेले आहे. त्यात म्हणण्यात आले आहे की, कुशल हा खूपच चांगला पिता होता. तो आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत नव्हता. त्याच्याबाबत ज्या काही गोष्टी पसरवल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत. कुशल आणि त्याच्या मुलाचे नाते खूपच चांगले होते.