'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशीने 'बरसातें' या मालिकेत अभिनेता कुशल टंडनसोबत काम केलं. या मालिकेत दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर हिट ठरलीच. पण त्याचसोबत खऱ्या आयुष्यातही शिवांगी आणि कुशल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नव्हता. पण आता कुशलच्या एका पोस्टमधून मात्र त्यांचं नातं कन्फर्म झालं आहे.
कुशल टंडनने शिवांगी जोशीसाठी तिच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. एवढेच नाही तर कुशलने शिवांगीला 'माझी गॉर्जियस' असं म्हटलं आहे. कुशालने शिवांगीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात दोघांनीही सारखेच टीशर्ट परिधान केल्याचं दिसून येत आहे. कॅप्शनमध्ये कुशलने लिहलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा my gorgeous. तू खूप दयाळू आहेस, तू खूप सौम्य आहेस, तू खूप काळजी घेणारी आहेस, तू खूप हसरी आहेस. एका मुलीत ज्या गोष्टी हव्यात, त्या सर्व तुझ्यात आहेस. तु माझ्या आयुष्यात यासाठी मी स्व:ताला भाग्यवान समजतो. पुढचे अनेक वाढदिवस एकत्र साजरे करुया आणि सुंदर आठवणी निर्माण करुया'.
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेली 'बरसातें' ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. कुशल टंडन आणि शिवांगी रिलेशनशिपमध्ये असून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचा चर्चा आहेत.