बॉलिवूडमध्ये (bollywood) सध्या गाजत असलेल्या सिनेमांमध्ये किरण रावच्या 'लापता लेडीज' या सिनेमाचं नावदेखील घेतलं जात आहे. प्रेक्षक या सिनेमाला उत्तम प्रतिसाद देत आहे. या सिनेमात अभिनेत्री नितांशी गोयलने (Nitanshi goel) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सिनेमात फूल ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. यामध्ये अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका दिग्दर्शकांने आईसमोर आपल्याला शिवीगाळ केल्याचं म्हटलं.
अलिकडेच नितांशीने 'झूम'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरविषयी भाष्य केलं. एका मालिकेच्या सेटवर नितांशीला दिग्दर्शकांनी शिवीगाळ केली होती. ज्यामुळे तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. "मी जवळपास ९ मालिकांमध्ये काम केलं आहे. यात एका मालिकेमध्ये एका अभिनेत्रीच्या जागी मला रिप्लेस करण्यात आलं होतं. त्यामुळे मी सेटवर गेले त्यावेळी लोक फारसे वेलकमिंग नव्हते", असं नितांशी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला चांगलं आठवतंय एका मालिकेच्या दिग्दर्शकांना मी अजिबातच आवडत नव्हते. एकदा असंच मालिकेचं शूट सुरु होतं आणि ते मॉनिटरवर बसल्या बसल्या माझ्यावर ओरडत होते. त्यांनी मला शिवीगाळही केली. माझी आई सुद्धा त्यावेळी मॉनिटरजवळ बसली होती. त्यामुळे त्यांचं माझ्याशी असं वागणं तिला जराही पटलं नाही. ती रडायला लागली."
दरम्यान, त्या मालिकेच्या सेटवर कायम माझ्यासाठी अपशब्द वापरले जायचे असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. लापता लेडीज या सिनेमात नितांशीने फूल ही भूमिका साकारली असून तिच्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे.