Join us

'लग्नाची बेडी' फेम संकेत पाठक या अभिनेत्रीसोबत चढणार बोहल्यावर, अभिनेत्याची पार पडली बॅचलर पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 1:32 PM

Sanket Pathak : 'लग्नाची बेडी' मालिका फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक २२ एप्रिलला विवाह बंधनात अडकणार आहे.

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात सध्या लग्नाचे वारे पाहताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावरील आणखी एक कपल लग्नबेडीत अडकणार आहे. विवाहबंधनात अडकण्यापूर्वी या अभिनेत्याने कलाविश्वातील काही मित्रांसोबत बॅचलर्स पार्टी एन्जॉय केलेली पहायला मिळाली. हा अभिनेता म्हणजेच लग्नाची बेडी मालिका फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक (Sanket Pathak). संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम (Suparna Shyam) हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर कार्यरत आहेत. दुहेरी या मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. मालिकेनिमित्त एकत्रित काम केल्यानंतर या दोघांमध्ये प्रेम जुळून आले. २९ सप्टेंबर २०१६ रोजी झालेली त्यांची ही पहिली भेट आता २०२३ मध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांनी मीडियाला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी एप्रिल २०२३ मध्ये आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

संकेत आणि सुपर्णाच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच संकेतने त्याच्या मित्रांसोबत गोव्याला जाऊन बॅचलर्स पार्टी साजरी केली. यावेळी अभिनेता जयेश शेवाळकर हा देखील या गोव्याच्या ट्रिपमध्ये सामील झाला होता. तर सुपर्णा श्याम ही देखील आपल्या खास मित्र मैत्रिणींसोबत ट्रीपला गेलेली आहे. हे दोघे कधी लग्न करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. लग्नासाठी संकेतने लग्नाची बेडी या मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे काही दिवस तरी तो या मालिकेचा भाग नसणार आहे. अर्थात आपले शूटिंग आटोपून तो लग्नाच्या तयारीला लागला आहे. 

संकेतने त्यांच्या लग्नाची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. येत्या शनिवारी म्हणजेच २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकेत आणि सुपर्णा विवाहबद्ध होत आहेत. पुण्यात या दोघांचेही मोठ्या थाटात लग्न पार पडणार आहे. या लग्नाला जवळच्या मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना त्यांनी आमंत्रण दिले आहे. तसेच सहकलाकार मंडळी सुद्धा या लग्नाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या लग्नाची धामधूम पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक दिसणार आहेत.

संकेत आणि सुपर्णाने एकमेकांना कधीही ऑफिशियली प्रपोज केले नव्हते. पण डिसेंबर महिन्यात सुपर्णाने संकेतच्या मावस बहिणीच्या लग्नात त्याला सरप्राईज देऊन प्रपोज केले होते. यावेळी संकेतच्या कुटुंबीयांनी सुपर्णाला पाठिंबा दर्शवला होता. सगळ्या नातेवाईकांनी या गोष्टीपासून संकेतला अनभिज्ञ ठेवले होते. ही सगळी अरेंजमेंट करण्यासाठी त्याचे काका त्याला बाहेर घेऊन गेले होते.

सगळी अरेंजमेंट झालीये असे कळताच काका त्याला घरी घेऊन आले. संकेतने दार उघडताच भयाण शांतता दिसली तेवढ्यात समोर गॅलरीत नटून थटून उभ्या असलेल्या सुपर्णाकडे त्याचे लक्ष वेधले. सगळ्यांच्या समोर सुपर्णाने संकेतला सिनेस्टाईलने प्रपोज केलेले पाहून त्यांचे चाहते सुद्धा अवाक झाले. हा व्हिडीओ सुपर्णा आणि संकेतने सोशल मीडियावर शेअर करताच ‘ हे कधी घडलं?’ अशा प्रतिक्रिया त्यांना मिळू लागल्या होत्या.