कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु असतं हे जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. यात खासकरुन त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल विषयी वा त्यांच्या वैयक्तिक जीवनात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर खऱ्या आयुष्यात ही कलाकार मंडळी आपल्याप्रमाणेच आयुष्य जगत असतील का असेही प्रश्न अनेकांना पडतात. विशेष म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अभिनेता संकेत पाठक याने दिली आहेत.अलिकडेच 'लग्नाची बेडी'फेम संकेतने 'लोकमत फिल्मी'च्या Awkward Rapid Fire या सेगमेंटमध्ये काही मजेशीर खुलासे केले. यात तो लोकप्रिय अभिनेता असूनही अगदी सर्वसामान्यांसारखाच राहतो हे त्याने आवर्जुन सांगितलं. इतकंच नाही तर त्याने एक मजेदार किस्साही सांगितला.
'तुझे जुने टी-शर्ट आई ओटा पुसायला घेते का?' असा प्रश्न संकेतला विचारण्यात आला. त्यावर, "हा प्रश्न खूप सात्विक आहे. पण, मला सांगतांना फार ऑकवर्ड फिल होतंय. खरं तर हे सगळ्यांच्याच घरात होतं. माझा एक खूप फेव्हरेट टी-शर्ट होता.अगदी जुना होईपर्यंत मी तो वापरला. आई मला वारंवार तो टाकून दे सांगत होती. पण, मी ऐकलं नाही. अखेर आईने तो फाडला", असं संकेत म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझ्या आईने तो टी शर्ट घेतला आणि त्याचे सहा लहान लहान तुकडे केले. आजही आमच्या ओट्यावर त्या टी शर्टचे तुकडे दिसतात जे बघून मला खूप राग येतो.म्हणजे वापरलेले कपडे ओटे वगैरे पुसायला वापरायचे हे मला पटतच नाही. पण, आज माझा फेव्हरेट टी शर्ट ओट्यावर लटकलेला आहे."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये संकेतने अनेक मजेशीर किस्से सांगितले. सध्या संकेत ही लग्नाची बेडी या मालिकेत राघव ही मुख्य भूमिका साकारत आहे. संकेत पाठक हा मराठी सृष्टीतला हँडसम हंक म्हणून ओळखला जातो. 'लग्नाची बेडी', 'दुहेरी', 'छत्रीवाली', 'दोस्तगिरी' अशा चित्रपट, मालिकेमधून प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तर राणी बेटी राज करेगी, प्रीत का दामन अशा हिंदी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.