Join us

'लग्नाची बेडी'फेम राघवने केला विदाऊट तिकीट प्रवास; भरावा लागला दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 7:23 PM

Sanket pathak: संकेतला विदाऊट तिकीट प्रवास करताना चक्क टीसीने पकडल्याचं समोर आलं आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'लग्नाची बेडी'. या मालिकेत अभिनेता संकेत पाठक (sanket pathak) याने राघव ही भूमिका साकारली आहे. आपल्या उत्तम अभिनयासह गुड लुकिंगमुळे संकेत अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते. सध्या त्याच्याविषयी अशीच एक चर्चा रंगली आहे. संकेतला विदाऊट तिकीट प्रवास करताना चक्क टीसीने पकडल्याचं समोर आलं आहे.

संकेतने अलिकडेच 'लोकमत फिल्मी'च्या Awkward Rapid Fire या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळातील काही मजेशीर किस्से सांगितले. यात डहाणूवरुन प्रवास करत असताना टीसीने कसं पकडलं ते त्याने सांगितलं.

"एकदा मी डहाणूवरुन मुंबईला येत होतो. त्यावेळी धावतधावत मी गुजरात एक्स्प्रेस पकडली आणि  त्याच्या थर्ड टायर एसीमध्ये चढलो.पण, त्यावेळी माझ्याकडे लोकलचं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. नेमका त्याचवेळी टीसी आला आणि त्याने माझ्याकडे तिकीट मागितलं. मीदेखील मोठ्या ऐटीत माझं लोकलचं तिकीट दाखवलं.पण, मला चूक समजली त्याचबरोबर मी एकदम गरीब मुलासारखा काहीच समजत नसल्यासारखा चेहरा केला", असं संकेत म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "टीसीने ते लोकलचं तिकीट असल्याचं सांगितलं. त्यावर मला हेच तिकीट दिलंय आणि हे या गाडीत चालेल असं मला सांगितलंय असं म्हणालो. त्यावर टीसीने माझ्याकडे फाईन मागितला. मी गपचूप माझं पाकीट काढलं आणि त्यात फक्त २२ रुपये होते. विशेष म्हणजे त्या टीसीने माझ्याकडून २२ रुपये घेतले आणि मला सोडलं."

दरम्यान, सध्या संकेत 'लग्नाची बेडी' या मालिकेत राघव ही मुख्य भूमिका साकारत आहे. संकेत पाठक हा मराठी सृष्टीतला हँडसम हंक म्हणून ओळखला जातो. 'लग्नाची बेडी', 'दुहेरी', 'छत्रीवाली', 'दोस्तगिरी' अशा चित्रपट, मालिकेमधून प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तर राणी बेटी राज करेगी, प्रीत का दामन अशा हिंदी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन