Join us

समाजाचं प्रतिबिंब दाखवणारी “लेक माझी दुर्गा” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 4:25 PM

Lake My Durga :या मालिकेमधून समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्यपरिस्थिति आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

असं म्हणतात “आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वात सुंदर पान म्हणजे बालपण”. बालपणावर आपण सगळ्यांनीचं बरंच काही ऐकलं आहे नाही का ? जर, बालपणावर बोलायचं किंवा लिहायचं म्हंटल तर शब्द आणि वेळ दोन्ही अपुरं पडेल. पण, यामधील अविभाज्य घटक म्हणजे आई – वडील, त्यांना विसरून कसं चालेल. आई वडिलांच्या प्रेमाच्या बळावर प्रत्येक मुलं अनेक अडचणींवर मात करू शकतं. दु:ख आणि वेदनेच्या निखाऱ्यावरून हसत हसत चालू शकतं. बालपणाच्या या भावविश्वात एकाचं जरी प्रेम अपुर पडलं, मिळालं नाही तर त्याचे व्रण आयुष्यभर मनावर कोंदणासारखे राहतात. बालपणाचा पायाचं जर अनेक वेदनांनी आणि कटू आठवणींनी भरलेला असेल तर ते बालपण कधीच आयुष्यातील सुंदर पान वाटू शकणार नाही. याच धाग्यावर आधारित आई आणि मुलीचं हळूवार भावनिक नातं उलघडणारी मालिका कलर्स मराठीवर घेऊन येत आहे “लेक माझी दुर्गा” - जाणीव “ती” च्या अस्तित्वाची १४ फेब्रुवारीपासून दररोज संध्या ७.३०. वा. या मालिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्या पलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मालिकेमध्ये दुर्गाच्या भावविश्वात कुठेतरी वडिलांकडून तिला तुच्छ दर्जाची वागणूक मिळते आहे तर दुसरीकडे आईचे भरभरून प्रेम मिळते आहे. दुर्गाला आईच्या प्रेमापेक्षा तिच्या वडिलांच्या डोळ्यातील आग सलतेय. तिच्या या भावविश्वात तिला स्वत:च्या अस्तित्वासाठी का बरं संघर्ष करावा लागतो आहे ? का तिला वडिलांकडून झिडकारल जातं आहे ? लवकरच या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. अग्रगण्य क्रीएशन्स निर्मित आणि अभिजीत गुरु लिखित “लेक माझी दुर्गा” मालिकेद्वारे हेमांगी कवि पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 सातार्‍या जवळच्या एका छोट्या गावात राहणार्‍या जगताप कुटुंबाच्या “दुर्गा” चे भावविश्व जरा इतर लहान मुलांपेक्षा वेगळं आहे. जिथे तिला खेळायला मोठं आंगण आहे, घरात प्रेम करणारी, माया देणारी आई आहे, प्रेमळ, खाऊ देणारा, सगळ्यांना प्रेम करणारा बाबा आहे. दुरून जरी हे भावविश्व वा चित्र एकदम सुंदर दिसतं असलं तरीदेखील दुर्गाला मात्र एक प्रश्न सतत पडतो आहे माझा बाबा मला दूर का बरं ठेवतो ?  माझ्यावर का प्रेम नाही करत ? मी इतकी वाईट आहे का ?  त्यामुळे तिच्या वाटणीचे प्रेम, माया देखील दुसर्‍या मुलीला देत आहे. या मालिकेमधून मनोरंजनासोबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्यपरिस्थिति आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारकलर्स मराठी