कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेता संतोष हणमंत नलावडे (Santosh Nalawade) यांचं अपघातात निधन झालं आहे. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने टेलिव्हिजनविश्वात शोककळा पसरली आहे.
संतोष नलावडे हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागत कार्यरत होते. विभागीय महसूल क्रीड स्पर्धेसाठी ते नांदेड येथे गेले होते. तिथेच अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच सोमवारी(२४ फेब्रुवारी) दुपारी त्यांचा प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील वाढे या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष नलावडे यांना अभिनयाची आवड होती. नोकरी सांभाळत ते नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करायचे. 'अप्पी आमची कलेक्टर', 'लाखात एक आमचा दादा', 'मन झालं बाजींद', 'कॉन्स्टेबल मंजू', 'लागीर झालं जी' यांसारख्या मालिकांमध्ये ते दिसले होते. काही सिनेमांमध्येही त्यांनी छोट्या भूमिका निभावल्या होत्या.