लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये काही दिवसांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. लक्ष्मी मल्हारच्याच घरी रहात असून तिने ते घर सोडण्यास नकार दिला आहे. परंतु त्यामागचे कारण अजूनही मल्हारला माहिती नाहीये. आर्वीसमोर अजूनही लक्ष्मी आणि मल्हारच्या लग्नाचे सत्य आलेले नाही. लक्ष्मीच्या जाण्याने श्रीकांत खूपच अस्वस्थ झाला आहे. त्यांचा सगळा पैसा, वैभव हळूहळू निघून जात आहे याची कल्पना त्याला आली आहे. लक्ष्मी श्रीकांत म्हणजेच त्यांच्या घरासाठी आणि गावासाठी शुभ होती आणि ती गेल्यापासूनच ही सगळी संकंट येत आहेत याची जाणीव झाल्याने श्रीकांत लक्ष्मीला शोधण्यासाठी बाहेर पडला आहे. हा जुना गडी म्हणजेच श्रीकांत लक्ष्मीला भेटल्यावर कोणती नवी खेळी खेळणार हे बघणे रंजक असणार आहे.
लक्ष्मीचं मल्हारवरचं प्रेम नि:स्वार्थी असून त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये म्हणून लक्ष्मी घर सोडून जाण्यास नकार देत आहे. आर्वीने देखील लक्ष्मीने मागितलेले वचन तिला दिले असून आता लक्ष्मी मल्हारचे घर सोडून जाणार नाही हे तर नक्की आहे. हे सगळे होत असतानाच मल्हारच्या भावाचे लक्ष्मीवर एक तर्फी प्रेम असून तो त्याच्या प्रेमाची कबुली लवकरच देणार आहे. यावर मल्हारचे काय मत असेल ? लक्ष्मी यावर काय बोलणार ? तसेच लक्ष्मी – मल्हारच्या लग्नाचे सत्य श्रीकांत मल्हारच्या घरच्यांसमोर आणि आर्वीसमोर कसे आणेल ? लक्ष्मी श्रीकांतचे कारस्थान कसे उधळून लावणार ? कि लक्ष्मी श्रीकांतच्या जाळ्यामध्ये अडकणार ? हे येणा-या भागात पाहायला मिळणार आहे.
लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांन प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचं सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार यामुळे. त्या गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षकांना या व्यतिरिक्त मालिकेमधील अजून एक पात्र आवडत आहे आणि ते म्हणजे बाब्या. बाब्या म्हणजे मालिकेमधील लक्ष्मीचा जीवाभावाचा मित्र. लक्ष्मी मालिकेमध्ये या बाब्या बरोबर गावामध्ये बरीच फिरताना दिसते, लक्ष्मीला कुठली दुखापत झाली, तिला कधी कोणाची गरज भासली कि, हा बाब्या तिच्या बरोबर सावली सारखा असतो. लक्ष्मी बरोबर असलेला तिचा हा गोड मित्र तिच्या प्रत्येक जखमेवरील मलमच आहे. लक्ष्मी त्याच्यासोबत रमते, त्याच्या मिश्कील स्वभावामुळे, त्याच्या खोड्यांमुळे तिला तिच्या दु:खाचा क्षणभर का होईना पण विसर पडतो. या बाब्याचे आणि लक्ष्मीचे पडद्यामागे देखील खूप चांगले नाते आहे.