ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मोटे झळकणार प्रेम हे मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 8:03 AM
अनेकदा आपण आयुष्यात अनेक अनोळखी व्यक्तींशी बोलतो. सुरुवातीला ती अनोळखी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, पण हळूहळू ती कधी आपलीशी ...
अनेकदा आपण आयुष्यात अनेक अनोळखी व्यक्तींशी बोलतो. सुरुवातीला ती अनोळखी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, पण हळूहळू ती कधी आपलीशी होते हे आपल्यालाच कळत नाही आणि जेव्हा त्या व्यक्तीपासून वेगळे व्हायची वेळ येते, तेव्हा मात्र मनाला एक वेगळीच हुरहूर लागून जाते आणि एकमेकांच्या नकळत प्रेमाची गुढी उभी राहते. अमृता आणि स्वप्निल इच्छा नसतानाही एकेमकांबरोबर एक रूम शेअर करत असतात. पण एकमेकांसोबत राहात असताना ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडतात ते त्यांनादेखील कळत नाही. प्रेम हे या मालिकेच्या गुढी प्रेमाची या कथेत प्रेक्षकांना ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मोटे यांची जोडी पाहायला मिळणार आहे. स्वप्निल हा एका श्रीमंत घरातील मुलगा. पण वडील व्यवसायात व्यग्र असल्याने त्यांना त्याच्याकडे कधीच लक्ष देता आले नाही . लहानपणापासून तारुण्यापर्यंत अख्खा प्रवास एकट्याने केल्यामुळे त्याला आयुष्यात कोणाचीही साथ नको आहे. स्वप्नील वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी मुंबईत आला आणि त्याला एका कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीसुद्धा मिळाली. पण स्वप्निलला भविष्यात एक प्रसिद्ध उद्योगपती व्हायचे आहे. अमृतासुद्धा तिचे आधीचे प्रेम विसरण्यासाठी आणि स्वतःची डान्स अकादमी सुरू करण्याच्या उद्देशाने मुंबईला आली आहे. या दोघांच्या गोष्टीला सुरुवात होते ते प्रॉपर्टी एजंटच्या घोळामुळे. प्रॉपर्टी एजंट या दोघांना एकच रूम ऑफर करतो आणि पर्याय नसल्यामुळे या दोघांनाही ही रूम शेअर करावी लागते. सर्वांपासून अलिप्त होऊन एकटे राहणाच्या मनीषेने आलेले हे दोघेही आता इच्छा नसतानाही एकत्र राहतात. सुरुवातीपासूनच दोघांमध्ये तू तू मैं मैं सुरू होते. आता एक मुलगा आणि मुलगी एकाच रूममध्ये... ते कसे राहतात... त्यांच्यात नक्की काय काय होते आणि नंतर ते रूम शेअर करता करता खरेच आयुष्यसुद्धा शेअर करतात की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळेच घडते? हे या कथेच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गुढी प्रेमाची ही कथा तुषार गुंजाळ यांनी लिहिली असून या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे.