झी टॉकीज या मराठी वाहिनीवर, गेली अनेक वर्षे दर्जेदार मराठी चित्रपटांची रेलचेल असते. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळेच आज ही वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांची पहिली पसंती असलेल्या या वाहिनीवर, एखाद्या चित्रपटाचा प्रीमियर कधी होणार याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते.
येत्या रविवारी, १२ मे रोजी 'लपाछपी' या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' सर्वांच्या लाडक्या 'झी टॉकीज' या वाहिनीवर होणार आहे. विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, ही एका नवविवाहित दाम्पत्याची कहाणी आहे. या भयपटात पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहे. मराठी सिनेसृष्टीतील हा एक दर्जेदार भयपट असून, तो येत्या रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता 'झी टॉकीज'वर पाहता येईल. एका झपाटलेल्या घरात दोघांनी राहायला जाणं व त्यांच्या आयुष्यावर त्याचे होऊ लागलेले परिणाम याभोवती सिनेमाचे कथानक फिरते. हे कथानक उत्तमोत्तम प्रसंगांमधून मनावर पकड घेत जाते. चित्रपटात अधिक रंगत येत जाते.
तुषार आणि नेहा यांना शहरात काही संकटांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत शहरात राहणे सुरक्षित नाही हे तुषारच्या लक्षात येते. सुरक्षेच्या दृष्टीने, शहरापासून दूर, एखाद्या गावात जाऊन राहण्याचा निर्णय ते घेतात. त्यांचा चालक भाऊराव याच्या गावी, उसाच्या शेतातील घरात ते राहू लागतात. चिघळलेली परिस्थिती ठीक होईपर्यंत तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय ते घेतात. या नव्या घरात, नेहाला भाऊरावची पत्नी तुळसा भेटते. तुळसाचं संशयास्पद वागणं नेहाला खटकू लागतं. या घरात तिला निरनिराळे भासदेखील होऊ लागतात. आठ महिन्यांची गरोदर असलेली नेहा यामुळे काहीशी घाबरून जाते, परंतु या घटनांना धैर्याने तोंड देण्याचा निर्णय घेते. झपाटलेल्या घराचा, तिथल्या भुताटकीचा परिणाम आपल्या मुलावर होऊ नये यासाठी ती देत असलेला लढा यशस्वी ठरेल का? येऊ घातलेल्या संकटातून नेहा आपल्या बाळाला सोडवू शकेल का?