छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका लापतागंजमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. या मालिकेत चौरसिया ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता अरविंद कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सूत्रांच्या माहितीनुसार, अरविंद शूटला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती.
कोण आहे अरविंद कुमार?
अरविंद कुमार यांचा जन्म शामली येथे झाला होता. पॉलिटिकल सायन्स या विषयात त्यांनी पदवी संपादन केली होती. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी हिंदी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी मुंबई गाठली. लापतागंज या मालिकेत त्यांनी ५ वर्ष चौरसिया ही भूमिका साकारली. तसंच ते क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया या कार्यक्रमांमध्येही झळकले. त्यांनी चीनी कम, अंडरट्रायल, रामा राम क्या है ड्रामा, मैडम चीफ मिनिस्टर या सिनेमातही काम केलं आहे.