'लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी' असे म्हणत शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकथेने थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. अज्या आणि शीतलीच्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचा शेवट देखील प्रेक्षकांना प्रचंड भावला असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.
लागिरं झालं जी ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याने ही मालिका संपल्याचे दुःख या मालिकेच्या फॅन्सना होत आहे. पण केवळ या मालिकेचे फॅन्सच नाहीत तर या मालिकेच्या कलाकारांना देखील ही मालिका संपल्यामुळे प्रचंड वाईट वाटले आहे. या मालिकेच्या सेटवरचा शेवटचा दिवस कसा होता याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत या मालिकेतील सगळेच कलाकार भावुक झाल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. हे कलाकार अलिंगन देऊन एकमेकांना निरोप देत आहेत.
लागिरं झालं जी या मालिकेत हनुमंत फौजीची भूमिका साकारलेल्या महेश घागने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून हा व्हिडिओ लागिरं झालं जी या मालिकेच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे.
शिवानी बावकर आणि नितेश चव्हाण यांच्या जोडीने दीड वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं होतं. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक म्हणजे अजिंक्य शिंदेचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या होत्या. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले होते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्त्व होते. अजिंक्यचा मित्र राहुल्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी, भैय्यासाहेब या भूमिका रसिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या होत्या . त्यामुळे ही मालिका निरोप घेणार हे कळल्यापासून या मालिकेच्या फॅन्सना वाईट वाटले होते.