प्रत्युषा गेली अन् सगळं संपलं...! केस लढता लढता आई वडिल झाले कंगाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:56 PM2021-07-29T15:56:30+5:302021-07-29T15:59:55+5:30
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला (Pratyusha Banerjee) जावून आता 5 वर्षे उलटली आहेत. आईवडिलांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा...
‘बालिका वधू’ या मालिकेचं नाव काढलं की आठवतो तो प्रत्युषा बॅनर्जीचा (Pratyusha Banerjee) चेहरा. या मालिकेत प्रत्युषानं मोठ्या आनंदीची भूमिका साकारली होती. पण दुर्दैवानं प्रत्युषा आज आपल्यात नाही. 1 एप्रिल 2016 रोजी प्रत्युषा हे जग सोडून गेली. कथितरित्या आत्महत्या करत प्रत्युषानं आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आईवडिलांच्या मते, प्रत्युषाची आत्महत्या नसून हत्या आहे. प्रत्युषाला जाऊन उणीपुरी 5 वर्षे झाली आहेत आणि आजही तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही. तिचे आई बाबा आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलीला न्याय मिळावा, यासाठीची त्यांचा लढा सुरू आहे आणि ही कायदेशीर लढाई लढता लढता कंगाल झाले आहेत.
प्रत्युषाच्या अकाली निधनानं चाहते हळहळले होते. तिच्या आईवडिलांची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट झाली होती. एकुलत्या एका लेकीला गमावल्याच्या दु:खातून तिचे आईवडिल आजही सावरलेले नाहीत. ती गेली आणि आमचं सगळं काही संपलं. जणू एक खूप मोठं वादळ आलं आणि आमचं आयुष्य उद्धवस्त करून गेलं, असं प्रत्युषाच्या वडिलांनी म्हटलं आहे.
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी प्रत्युषाबद्दल बोलताना भावुक झालेत. माझ्या लेकीनं आम्हाला सर्व काही दिलं होतं. ती आमचा एकमेव आधार होती. प्रत्युषा गेली आणि सगळं संपलं. जणू एक वादळ आलं आणि सर्व काही घेऊन गेलं. प्रत्युषा गेल्यानंतर आता आयुष्य जगणं कठीण झालंय. आता एका खोलीच्या घरात राहण्याची वेळ आलीये. अनेकदा कर्ज घेऊन आम्ही दोघे कसेबसे जगतोय, असे शंकर म्हणाले.
प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिची आई घरखर्च चालवण्यासाठी एका चाइल्ड केअर सेंटरमध्ये काम करते आणि वडील कथा कहाण्या लिहितात.
मरेपर्यंत तिच्यासाठी लढणार...
माझ्याकडचा होता नव्हता तेवढा पैसा संपला आहे. मी कंगाल झालोय. पण हिंमत सोडलेली नाही. प्रत्युषाला न्याय मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील. एकदिवस आम्ही जिंकू, असा विश्वास मला आहे, असेही ते म्हणाले.
अभिनेत्री बनण्याचं स्वप्नं घेऊन मुंबईत आली होती प्रत्युषा...
प्रत्युषाला मोठी अभिनेत्री बनायचं होतं. हेच स्वप्नं घेऊन ती जमशेदपूरहून मुंबईला आली होती. ती अभिनेत्री बनली. पण करिअर ऐन भरात असतानाच तिची जीवन यात्रा संपली. 1 एप्रिल 2016 रोजी ती पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली होती. तेव्हा तिने आत्महत्या केली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असं प्रत्युषाच्या आई वडिलांनी म्हटलं होतं. त्याचीच केस ते अद्यापही लढत आहेत. प्रत्युषा ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती.