कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे सा-यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. सा-याचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.
तो आला, त्यांनी पाहिलं, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला... आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे. दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्या या विनोदाच्या बादशाहाची ची एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती... या कलाकाराला जाऊन तब्बल १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. २६ ऑक्टोबर १९५४ मध्ये जन्माला आलेल्या आणि प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्या या विनोदातल्या अवलियाच्या जन्मतिथीनिमित्त आदरांजली म्हणून, या बादशाहाचे सिनेमे आठवडाभर सोनी मराठी या वाहिनीवरून दाखवले जाणार आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डेसाठी असलेल्या या विशेष कार्यक्रमाला 'विनोदाचा बादशाह लक्ष्या' हे नाव देण्यात आलं असून या दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेंच्या धमाल सिनेमांची रंगत प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत. २२ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत रोज दुपारी ३ वाजता प्रेक्षक आपल्या लाडक्या लक्ष्याच्या काही अजरामर कलाकृती पाहू शकणार आहेत. यात 'एकापेक्षा एक' 'चिकट नवरा' 'रंग प्रेमाचा', 'लपवा छपवी' 'इजा, बिजा, तिजा' आणि 'बजरंगाची कमाल' या सिनेमांचा समावेश आहे.
गेली दोन दशकं प्रेक्षकांचं लक्ष्यावरचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही... ‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपटविश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्यानं मराठी सिनेसृष्टी गाजवली. याचा प्रभाव एवढा होता की , लक्ष्याच्या हिंदी पदार्पणावेळी ‘लक्ष्या आला रे...!’ चा डंका पिटण्यात आला होता. मराठी हिंदी विनोदी नटांना पुरून उरलेल्या अशा लक्ष्याचे चित्रपट सोनी मराठीवर पाहता येणार आहेत. तेव्हा रसिकांना हसवण्याचा विडा उचललेल्या लक्ष्याच्या जन्मतिथीनिमित्त आपल्या लाडक्या लक्ष्याच्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान घेता येणार आहे.