Join us

कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार 'लिटिल चॅम्प'; थाटात पार पडला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:18 IST

Kartiki Gaikwad Pregnancy News: कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

झी मराठीवरील 'लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. उत्तम स्वरसाज असलेल्या कार्तिकीने आपल्या सुमधूर आवाजाने प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्ध केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे कार्तिकीने नुकतीच एक गुडन्यूज शेअर केली आहे. कार्तिकी लवकरच आई होणार आहे.

नुकताच कार्तिकीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमाचा व्हिडीओ fillamwala या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी कार्तिकीने गडद हिरव्या रंगाची साडी नेसली होती. सोबतच तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचं तेज दिसून येत होतं.  विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती इतके दिवस सोशल मीडियावर सक्रीय का नव्हती यामागचं कारण चाहत्यांना स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, कार्तिकीने २०२० मध्ये रोनित पिसे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती आता तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. मे महिन्यात कार्तिकी तिच्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी