२३ जुलै लोकमान्य टिळकांची जयंती आणि ०१ ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांच्या १०३ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रावर अल्पसा प्रकाश टाकून त्यांच्या कार्याचे स्मरण केले. केवळ या कार्यक्रमापुरता नाही, तर या दोन्ही दिवशी लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रातील विविध पैलूंचा आढावा सर्वच स्तरातून घेतला जातो. विचित्र योगायोग म्हणजे, ज्यांच्या जीवनचरित्राविषयी भरभरून बोलले जाते, लिहिले जाते, ऐकले जाते, त्या लोकमान्य टिळकांच्या अलौकिक चरित्राचा आढावा घेणारी ‘लोकमान्य’ ही टीव्हीवरील मालिका आता बंद झाली आहे. २१ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झालेली लोकमान्य ही मालिका अवघ्या ७ महिन्यांत बंद झाली. टीआरपी नसल्याचे कारण मालिका बंद होण्यामागे वाहिनीकडून देण्यात आल्याचे समजते.
लोकमान्य टिळकांवर आधारित मालिका बंद झाली. यानिमित्ताने ऐतिहासिक चरित्रगाथा सांगणाऱ्या मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठच फिरवल्याचे पाहायला मिळते. याची अनेक उदाहरणे देता येतील. अनेक वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्वामी’ मालिकेपासून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘सावित्रीजोति’ या मालिकेपर्यंत अचानक थांबावाव्या लागलेल्या अनेक मालिका आहेत. राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी यांच्याशी संबंधित जयंती वा पुण्यतिथीच्या दिवशी आजच्या काळात सोशल मीडियावर भरभरून लिहिले जाते. स्टेटस ठेवले जातात, चर्चा केली जाते. पण, ते अगदी तेवढ्यापुरते आणि वरवरचे असते, हेच दिसून येत आहे.
प्रेक्षकांचे चुकले?
एखादी मालिका यशस्वी होण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा असतो. वाहिनी आणि निर्माते यांच्यासह एखादी मालिका सुरू राहण्यामध्ये प्रेक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून टीआरपीची गणिते आखली जातात. टीआरपीच्या गणितावरून जाहिराती, टाइम स्लॉट या सगळ्या बाबी अवलंबून असतात. एखाद्या मालिकेला जाहिराती किती मिळतात, हेही पाहिले जाते. एखादी मालिका टीआरपीच्या नावाखाली बंद होते, तेव्हा त्याकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली असे म्हटले जाते. लोकमान्य तसेच अन्य काही मालिकांबाबत हेच झाले, असे दिसते. सासू-सुनांची भांडणे, कौटुंबिक विषय, हेवेदावे, एकमेकांच्या कुरापती काढणे, प्रेम-रोमान्स अशा अनेकविध प्रकारच्या मालिका किंवा मालिकांचे विषय अगदी चवीने पाहिले जातात. वर्षानुवर्षं अगदी हजार एपिसोड पूर्ण करणाऱ्या मालिकांची अनेक उदाहरणे आहेत. याविषयी महिला मंडळात अनेकदा गॉसिपही होताना दिसते. मात्र, ज्यांच्यामुळे समाजाचा एक मजबूत पाया रोवला गेला, स्वातंत्र्यसंग्रामात सर्वस्व त्यागलेल्या महापुरुषांच्या ऐतिहासिक चरित्रगाथा, वैचारिक मालिका प्रेक्षकांना नकोशा झाल्यात का, असा प्रश्न पडतो. मात्र, ऐतिहासिक चरित्रगाथांचे विषय असलेल्या मालिकांना प्रेक्षकांनी साथ देणे, पाठिंबा देणे गरजेचे आहे. कारण असे विषय समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
वाहिन्यांचीही जबाबदारी
एखादी मालिका सुरू झाल्यावर ती कोणत्या वारी, कोणत्या वेळेला सुरू होतेय, यालाही महत्त्व असते. प्राइम टाइम स्लॉट हा तर गेल्या काही वर्षांत तीव्र स्पर्धेचा विषय झाला आहे. एखाद्या वाहिनीने, आमची एवढी परंपरा, अमूक एवढ्या हिट मालिकांची जंत्री, अमूक एका कार्यक्रमाची कित्येक आजही आठवण काढली जाते, अशा प्रकारची आत्मस्तुति करण्यापेक्षा ज्यांचा प्रभाव देशभरात आहे, अशा चरित्रगाथांची मालिका अट्टाहासाने सुरू ठेवायला हवी. त्यातून वाहिन्यांची विश्वासार्हता, चतुरंगी मालिका देण्याची परंपरा आणि समाजाला आपण काहीतरी दिले, हे गुण आत्ममग्नतेपेक्षा अधिक उठावदारपणे दिसून येतील, यात संशय नाही, असे सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून वाटते. यापूर्वीही अनेक मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. खास लोकाग्रहास्तवाच्या नावाखाली ‘बंद होणार’ अशी घोषणा झालेल्या मालिकांचे भाग वाढवण्यात आल्याचंही आपण पाहिलंय. दुसरे म्हणजे, मालिका सुरू होईपर्यंत प्रमोशन केले, असे दावे करून उपयोग नाही. एखाद्या मालिकेला त्या ठरावीक वेळेस प्रतिसाद मिळत नसेल, तर मालिकेची वेळ बदलून पाहणे किंवा निर्मात्यांची चर्चा करून त्यात आणखी काही वेगळे देता येऊ शकेल का, असे प्रयोग करून पाहणे आवश्यक आहे. आज ठरले आणि उद्या मालिका बंद झाली, असे होता कामा नये, असे प्रामाणिकपणे वाटते.
मालिका एक सशक्त माध्यम
केवळ ‘लोकमान्य’ मालिकेबाबत बोलायचे झाल्यास लोकमान्य टिकळ यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘लोकमान्य: एक युगपुरुष’ नावाचा चित्रपट आला होता. लोकमान्य टिळकांवर विविध लेखकांनी अगदी उच्च दर्जाचे लेखन केले आहे. मात्र, अलीकडील काळात घराघरात रुजलेला मालिका हा प्रकार चरित्रगाथा दाखवण्यासाठीचे एक सशक्त माध्यम ठरू शकते. कारण, चित्रपट असो वा लेखन याला मर्यादा आहेत. मात्र, टीव्हीवरील मालिका यांना तसे पाहिल्यास मर्यादा नाही. निर्माते आणि टीव्ही चॅनल या संबंधित मालिकेचे कितीही एपिसोड सादर करू शकतात. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्राचा विचार केल्यास मालिका प्रकार हा त्या बाबतीत अगदी योग्य ठरतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ आणि गीतारहस्य ही लोकमान्य टिळकांच्या एकूणच प्रचंड बुद्धिमत्ता, अभ्यास, चौकसपणा, सखोल व विस्तृत विचारक्षमता यांची एक चुणूक दाखवणारी पुस्तके आहेत. एवढेच नव्हे, तर अगदी काही वर्षांपर्यंत टिळक पंचांग आवर्जून वापरले जायचे. कालौघात याचा वापर अतिशय नगण्य राहिल्याचे पाहायला मिळते. केवळ लोकमान्य टिळक नाही, तर अनेक ऐतिहासिक चरित्रगाथा विषयांवरील मालिकांबाबत असेच म्हणता येऊ शकेल. कारण, त्या व्यक्तीची ‘लार्जन दॅन लाइफ’ ही इमेज आपण त्यातून साकार करू शकतो. त्या व्यक्तींच्या जीवनातील अनेकविध गोष्टी समाजापर्यंत पोहोचवू शकतो.
निर्माते कमी पडले का?
लोकमान्य ही मालिका बुधवार ते शनिवार या दिवशी रात्री प्रसारित केली जाते. साधारणपणे प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार अशी मालिका बघण्याची सवय असते, असा दावा केला जातो. हे एकच कारण टीआरपी कमी असणे आणि मालिका बंद होणे, याला कारणीभूत ठरू शकत नाही. काही मालिकांची उदाहरणे देता येऊ शकतील की, ज्या अशा स्लॉटमध्ये नसतानाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवणाऱ्या ठरतात. प्रमोशन हाही एक महत्त्वाचा भाग आहे. वाहिनीने प्रमोशन केले की झाले, असे धोरण योग्य नाही. मालिका सुरू झाल्यानंतरही प्रमोशन सुरू ठेवायला हवे. लोकांपर्यंत, समाजापर्यंत जात राहायला हवे. तर त्या संबंधित मालिकेविषयी चर्चा सुरू राहते. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमे ही अनेकपटीने सशक्त झालेली आहेत. त्यामुळे त्यांना हाताशी घेऊन अधिकाधिक प्रमोशनवर भर देणे आवश्यक आहे. अलीकडील काळात सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन अनेक गोष्टी दाखवल्या जातात. ऐतिहासिक चरित्रगाथांच्या विषयांमध्ये ट्विस्ट, सस्पेन्स निर्माण करता येऊ शकेल का, प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाईल, अशा प्रकारे मालिकांच्या भागांची रचना करता येऊ शकेल का, याकडे निर्मात्यांचा भर असणे आवश्यक आहे. अर्थातच, त्यात इतिहासाची मोडतोड होणार नाही याकडे कटाक्ष हवाच.
निश्चित भागांची मालिका 'बेस्ट'
अलीकडच्या काळात निश्चित भागांची मालिका ही संकल्पना पाहायला मिळाली. वास्तविक पाहता आजच्या धावत्या आणि बिझी शेड्युलच्या जीवनपद्धतीत अशा मालिका दाखवल्या जाणे ही चांगली बाब मानली पाहिजे. १०० भागांची मालिका किंवा मालिकांचे भाग निश्चित करून दाखवले जाऊ शकतात. यावर अगदी गंभीरपणे विचार व्हायला हवा. कारण एकदा भागांची संख्या ठरली, तर नेमके काय आणि किती दाखवायचे, यावर सखोलपणे अभ्यास केला जाईल आणि नेमके ते तेवढेच प्रेक्षकांना दाखवले जाईल.
शेवटी, केवळ लोकमान्य मालिका नाही, तर अशा प्रकारच्या मालिकांची निर्मिती करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे असते. कोणतीही वाहिनी तोटा सहन करून मालिका दाखवेलच असे नाही. निर्मात्यांनाही आर्थिक गणिते जुळवायची असतात. निर्मातेही तोटा सहन करून मालिका करतीलच, असे नाही. पण, आर्थिक गणिते, टीआरपी, जाहिराती या सगळ्याचा समन्वय साधून ऐतिहासिक चरित्रगाथा सांगणाऱ्या मालिका आणणे आणि त्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. टीआरपी नसल्यामुळे मालिका बंद होणे ही प्रेक्षक, वाहिनी आणि निर्माते यांच्यासाठी अतिशय खेदजनक बाब म्हणावी लागेल.
- देवेश फडके.