संपू्र्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. अनेक नागरिक, नेते आणि सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. मराठमोळ्या शिव ठाकरेनेही मतदानाचा हक्क बजावत त्याचं महत्त्व चाहत्यांना पटवून दिलं आहे. शिवबरोबरच त्याच्या ८१ वर्षीय आजीनेही मतदान केलं.
शिव ठाकरे त्याच्या ८१ वर्षाच्या आजीबरोबर मतदान केंद्रावर पोहोचला. अमरावतीतील मतदान केंद्रात जाऊन शिवने आजीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर शिवने त्याच्या आजीबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. "तुमच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. यासाठी मतदान हाच पर्याय आहे. मी वोट केलं...आता तुम्ही पण करा", असं कॅप्शन या फोटोला शिवने दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील अकोला, अमरावती, यवतमाळ -वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागत आहे.