Join us  

ठाकरेंच्या शिवसेनेतील किरण मानेंची भाजपाच्या उदयनराजेंसाठी पोस्ट, म्हणाले, "महाराज, अभिमान आणि आनंद..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 6:02 PM

Lok Sabha Election Result 2024 : "शशिकांत शिंदे साहेबांसाठी वाईट वाटतंय, पण...", उदयनराजेंच्या विजयानंतर किरण मानेंची पोस्ट

Loksabha Election Result 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. देशात आणि राज्यात कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातारा मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. साताऱ्यात भाजपाकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंनी विजय मिळवला आहे.

उदयनराजे भोसलेंच्या गळ्यात विजयी पताका पडल्यानंतर मराठी अभिनेता आणि ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या किरण मानेंनी पोस्ट शेअर केली आहे. किरण मानेंनी उदयनराजेंचं अभिनंदन केलं आहे. "महाराज...अभिनंदन आणि आनंद! तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा विरोध आम्ही आयुष्यभर करणार...शशिकांत शिंदे साहेबांसाठी वाईटही वाटतंय. पक्ष वगैरे गेला खड्डयात...आमचे महाराज या नात्याने तुम्ही निवडून आलात याचा आनंद आहे", असं किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

नेहमी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टमधून विरोध करणाऱ्या किरण मानेंनी भाजपाच्याच विजयी उमेदवारासाठी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी  कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, साताऱ्यात उदयनराजेंनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्याविरोधात ३१ हजार २१७ मतांनी विजय मिळवला. 

स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच स्थान मिळाले नव्हते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेसाठी भाजपचा पहिला खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत ही उदयनराजेंसाठी महत्त्वाची राहिली.

टॅग्स :उदयनराजे भोसलेमराठी अभिनेताकिरण मानेलोकसभा निवडणूक २०२४ निकाल