कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत भक्तांच्या मनाला भिडणारे अनेक प्रसंग बघायला मिळाले. बलाढ्य असुरांचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशी 'आई तुळजाभवानी'ची महागाथा सध्या कलर्स मराठीवर सुरु आहे.
भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता - तुळजा ते भक्तांवर अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला हे प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सध्या मालिकेच्या कथाभागात कद्दारासूरने गावात उच्छाद मांडला होता, प्रत्येक भक्ताचे जगणे त्याने मुश्किल केले होते. नुकत्याच समोर आलेल्या भागामध्ये शिवकन्या अशोकसुंदरीला देखील आपल्या मायाजाळमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्याने केला जो महादेवांनी उधळून लावला. आता अखेर मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून होणार आहे. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव येणार आहेत.
देवीच्या मदतीला देवांचे देव महादेव येताहेत
महादेव पृथ्वीवर भवानीशंकर रूपात अवतरणार असून संकटात सापडलेल्या देवीच्या मदतीला देवांचे देव महादेव येत आहेत. प्रत्यक्ष पार्वती मातेच्या तुळजाभवानी अवताराला त्रास देणारे हे आसुरी संकट कोणते ? ते दूर करण्यासाठी महादेवांनी रांगडे भवानी शंकर रूप का घेतले ? मुलगी अशोकसुंदरीला महादेवांनी पृथ्वीवर राहण्याचे दिलेल्या वचनाचे काय होणार ? ते पूर्ण होईल का या अनेक प्रश्नांची उत्तरे या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.