Join us

वडिलांची नोकरी गेली अन्...माधवी निमकरला आठवले लहानपणीचे दिवस, 'नववीत असतानाच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 10:01 AM

लग्नानंतर स्वयंपाक करणं का अवघड गेलं नाही याचा एक किस्सा सांगितला.

मराठी अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nemkar) तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे योगा करतानाचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करते. माधवीची फिटनेस जर्नी प्रेरणादायी आहे. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या माधवीवर लहानपणीच मोठी जबाबदारी पडली होती. लग्नानंतर स्वयंपाक करणं का अवघड गेलं नाही याचा एक किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता.

माधवी निमकर मूळची खोपोलीची आहे. तिथेच तिचं शालेय शिक्षणही झालंय. लहानपणीच तिच्या वडिलांची नोकरी गेली तेव्हा माधवी आणि तिच्या आईने कशी जबाबदारी घेतली याचा किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला. माधवी म्हणाली,"मी नववीत असल्यापासूनच स्वयंपाक करायला शिकले होते. कारण माझ्या वडिलांची नोकरी ११ महिन्यांसाठी बंद झाली होती. म्हणजे ती कंपनीच बंद पडली होती. पुढे अंधार दिसत होता. आम्ही लोणच्याशी पोळी खात होतो. आई म्हणायची कडधान्य जरा स्वस्त असतात. भरपूर रस्सा बनवून करता येतात. असे दिवस आम्ही काढत होतो. मग आईने पेपर एजन्सीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तिला घरी यायला ९ वाजणार होते. तेव्हा ती म्हणाली की मी तुला कुकर लावायला शिकवून ठेवते तू तेवढा लावत जा मी घरी आले की पोळ्या करेन. तेव्हा मी आठवी-नववीत होते."

परिस्थितीमुळे समजूतदारपणा येतो. एखादी दुसरी आठवीतील मुलगी असती तर म्हणाली असती हॅ मी नाही करणार पण परिस्थिती शिकवते. मी हळूहळू पोळ्याही करायला शिकले. मला लग्नाच्या आधीही जेवण व्यवस्थित बनवता येत होतं त्यामुळे नंतर मला नाही अवघड गेलं."

माधवी सध्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत काम करत आहे. यामध्ये ती खलनायिका साकारत आहे. माधवीचा मोठा चाहतावर्गही आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार