छोट्या पडद्यावर काही वर्षांपूर्वी एका मालिकेच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. प्रत्येक घराघरात रोज संध्याकाळी ७.३० वाजता 'आई कुठे काय करते' ही मालिका अगदी न चुकता पाहिली जायची. या मालिकेतील अरुंधतीत प्रत्येक घरातील स्त्री स्वत:ला पाहत होती, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण, आता मात्र पाच वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. आता 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने मधुराणीदेखील भावुक झाली आहे. राजश्री मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "खूपच मोठा प्रवास होता. मालिका सुरू होताना हे वाटलं नव्हतं की आपण ५ वर्ष चालणाऱ्या, प्रेक्षकांचं प्रेम मिळणाऱ्या एका प्रोजेक्टचा भाग होतो आहोत. ही ५ वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही. महिन्यातील २०-२२ दिवस आम्ही शूटिंगसाठी सेटवरच असायचो. इतक्या वेगळ्या प्रकारचे सीन केले. अरुंधतीचा ग्राफ, इमोशन्स...त्या भूमिकेचे वेगवेगळे पदर साकारले. त्यामुळे थोडंसं भावुक व्हायला होतंय", असं मधुराणी म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "प्रेक्षकांचा प्रतिसादही खूप चांगला होता. आपण इथे शूट करत असतो. टीआरपी बघत असतो. त्यामुळे प्रेक्षकांना भेटायची तशी वेळ येत नाही. पण, जेव्हा अरुंधतीच्या नव्या प्रवासावेळी आमची मालिका रंजक वळणावर होती. तेव्हा प्रेक्षक ज्या पद्धतीने येऊन भेटले...आजही प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी असतं. ते अरुंधतीमध्ये स्वत:ला बघत असतात. प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका मला टेलिव्हिजनच्या माध्यमातून करायला मिळाली, हे माझं भाग्य आहे".