छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar) घराघरात पोहोचली. या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. पडद्यावर तीन मुलांच्या आईची भूमिका साकारणारी मधुराणी खऱ्या आयुष्यात एका लहान मुलीची आई आहे. आज मधुराणीकडे अनेक स्त्रिया एक आयडॉल स्त्री आणि आई या नजरेने पाहतात. यामध्येच तिने तिच्या लेकीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाचं सध्या सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे.
"मधुराणीने तिच्या लेकीची शाळा निवडतांना बराच विचार आणि अभ्यास केला. त्यानंतरच तिने तिच्या लेकीसाठी उत्तम शाळा निवडली. मुलीच्या शाळेविषयी अलिकडेच तिने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. तसंच तिची शाळा कशी आहे हे सुद्धा सांगितलं.माझ्या लेकीला पुणे खूप आवडतं. तिथे तिची वेगळ्या प्रकारची शाळा आहे. ती ज्या पद्धतीच्या शाळेत जाते, तशी शाळा जर मुंबईत मिळाली तर मी ताबडतोब तिला मुंबईला घेऊन येईन. तिला कुठलाही बोर्ड नाही, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग, बेचेंस, गणवेश काहीच नाहीये. अशा पद्धतीची तिची शाळा आहे. गोकुळ असं तिच्या शाळेचं नाव आहे. डॉ. जोत्स्ना पेठकर या त्या शाळेच्या संचालिका आहेत", असं मधुराणी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझ्या मुलीची जी जडणघडण आहे. तिचा जो स्वभाव आहे त्याला अनुरुप अशी ही शाळा आहे. तुम्ही कळपाचा भाग असलंच पाहिजे असं काही नाही. मला असं वाटतं की, आपल्या मुलाला ओळखून त्या दृष्टीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणजे १० जण असं करतायत म्हणून तू सुद्धा तसंच करायला पाहिजे असं काही नाही." दरम्यान, मधुराणी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मधुराणी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. बऱ्याचदा ती तिच्या कविता वाचनाचे कार्यक्रम करत असते.