मराठमोळ्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी सिनेमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख मिळवली. माधुरीची जादू आजही बॉलिवूडमध्ये कायम आहे. रिएलिटी डान्स शो 'डान्स दिवाने' मध्ये माधुरी परीक्षक आहे. १५ मे रोजी माधुरी 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. डान्स दिवानेच्या सेटवर तिला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज मिळालं. तिचे पती श्रीराम नेने यांनी शोमध्ये हजेरी लावली. तर माधुरीची सख्खी बहीणही पहिल्यांदाच टीव्हीवर दिसली.
माधुरी दीक्षितला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. 'डान्स दिवाने' शोमध्ये माधुरीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पती डॉ श्रीराम नेने यांनी शोमध्ये हजेरी लावली. त्यांनी माधुरीसोबत रोमँटिक डान्सही केला. याव्यतिरिक्त माधुरीला खास सरप्राईज मिळालं. तिची बहीण रुपा दीक्षित दांडेकर या व्हिडिओ कॉलवरुन सहभागी झाल्या. माधुरीला शुभेच्छा देत त्या म्हणाल्या,"माधुरी मी तुला एका छोट्याशा, चिटुकल्या मुलीला एक आदरणीय व्यक्ती होताना बघितलं आहे जिचं सगळं जग कौतुक करतं. मी जेव्हा केव्हा तुझ्यासोबत वेळ घालवते, गप्पा मारते तेव्हा मला वाटतं की मी किती नशीबवान आहे की तू माझी छोटी बहीण आहे. तुझं कौतुक, दृढनिश्चय, स्वभाव मला प्रेरित करतो. मला आपले लहानपणीचे किस्से आठवतात. मनातलं एकमेकांना सांगणं. एकाच बैठकीत सगळा चॉकलेट केक फस्त करणं, शाळेतून येताना पावसात भिजणं, पाण्यात उड्या मारणं, रॉकस्टारचं नाटक करणं, डान्स प्रॅक्टिस परफॉर्मन्स सगळंच जादुई होतं. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रार्थना करते की तू नेहमी खूश राहा. मस्ती करत राहा डान्स करत राहा, परफॉर्म करत राहा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
याशिवाय माधुरीच्या दोन्ही मुलांनीही तिला खास संदेश पाठवत शुभेच्छा दिल्या. माधुरीची बहीण रुपा दीक्षित या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीनवर दिसल्या. माधुरीला मिळालेलं हे सरप्राईज पाहून ती भावूक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सर्वांचेच आभार मानले.