हसण्यामुळे तुमचा त्रास दूर होतो असे म्हणतात ते खरेच आहे. आपल्याला कितीही टेन्शन असली, तरी हसण्याची एक फैर झडली की आपल्याला जाणवते की आपले आयुष्य खरोखरीच किती सुंदर आहे. छोट्या पडद्यावरील 'मेरे साई' मालिकेत नुकतीच दाखल झालेली स्नेहा वाघ आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे सेटवर आपल्या सह-कलाकारांना विनोद करत सा-यांना खूप हसवत असते. श्री साई बाबांनी समाधी घेतली त्याच्या शताब्दीच्या औचित्याने ही मालिका सुरू करण्यात आली होती आणि प्रेक्षकांनी ती उचलून धरली आहे. याच्या कथानकानुसार, त्यात जुन्या काळच्या शिर्डीचे चित्रण आहे, ज्यात गावकर्यांना ब्रिटिश शासन,जमीनदार यांच्यासारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.या कथानकामुळे सेटवरील वातावरण तसे गंभीर असते. आपल्या विनोदांनी आणि हसण्याने स्नेहाने हे गंभीर वातावरण पालटून ते अगदी हलकेफुलके केले आहे. अबीर सूफीला विचारले असता,त्याने पुष्टी करत म्हटले, “स्नेहा ही मेरे साई परिवारात नुकतीच दाखल झाली आहे. ती स्वतः एक चैतन्यमूर्ती आहे आणि तिने सेटवरील वातावरण देखील सळसळते केले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आणि एक चांगली व्यक्ती देखील आहे.तिचे सतत आनंदी राहण्याचे कारण प्रोत्साहक आहे आणि सर्वांना प्रभावित करणारे आहे. तिची तुळसाची भूमिका आव्हानात्मक आहे पण ती समर्थपणे ही भूमिका पेलते आहे.ती आमच्या टीमचा भाग झाली आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.युनिटने सेटवर तिचे नाव लाफ्टर मशीन ठेवले आहे, जे माझ्या दृष्टीने अगदी सार्थ आहे.” अलीकडेच या मालिकेत तुळसाच्या रूपात दाखल झालेल्या स्नेहा वाघ सोबत चित्रीकरण करताना एक गंमतीशीर प्रसंग घडला.'मेरे साई'च्या एका दृश्यात स्नेहाला अबीर म्हणजे साई बाबांचे पाय दगडाने घासायचे होते. अबीरला लागू नये याची काळजी आणि भीती मनात असल्याने स्नेहा काळजीपूर्वक काम करत होती. दिग्दर्शकाला हे दृश्य वेगळ्या प्रकारे साकारायचे होते आणि त्याने स्नेहाला दृश्य नैसर्गिक वाटेल अशा रीतीने सादर करण्याची विनंती केली. स्नेहा तुळसाच्या व्यक्तिरेखेशी इतकी जोडली गेली होती की, तिने अबीरचे पाय जोरजोरात इतके घासले की, पाय गडद लाल झाले. दिग्दर्शकाने पुन्हा पुन्हा थांबण्यास सांगून देखील ती तिच्या व्यक्तिरेखेत इतकी मग्न झाली होती की, तिचे लक्षच नव्हते त्यामुळे ती थांबली नाही. अबीरने खेळकरपणे हा प्रसंग स्वीकारला आणि तिच्या कामाबद्दलच्या निष्ठेबद्दल तिचे कौतुक केले.
'मेरे साई'च्या सेटवर स्नेहा वाघच्या हास्याची जादू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:32 AM