Join us

VIDEO : जेव्हा एका गायीने वाचवले आदेश भाऊजींचे प्राण, बांदेकरांनी सांगितला सिन्नरमधील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:38 AM

Aadesh Bandekar, Maha Minister : देव तारी त्याला कोण मारी! आदेश बांदेकर यांनी सिन्नरमधील ‘होम मिनिस्टर’च्या शूटींगदरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.

Aadesh Bandekar, Maha Minister : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर  (Aadesh Bandekar) सध्या ‘महा मिनिस्टर’ (Maha Minister) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. सध्या ते  या कार्यक्रमाद्वारे अकरा लाखाच्या पैठिणीच्या मानकरी माऊलीचा शोध घेत महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. येत्या रविवारी ‘महा मिनिस्टर’चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.  ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) या महिला वर्गात तुफान लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. गेल्या 18 वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ सुरू आहे आणि हा प्रवास आता ‘महा मिनिस्टर’पर्यंत पोहोचला आहे. साहजिकच या काळात अनेक अनुभव, अनेक किस्से आदेश भाऊजींच्या वाट्याला आलेत. अलीकडे त्यांनी या प्रवासादरम्यानचा एक असाच किस्सा शेअर केला. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर हा किस्सा शेअर करण्यात आला आहे.

जेव्हा एका गायीने वाचवले प्राण...आदेश बांदेकर यांनी सिन्नरमधील ‘होम मिनिस्टर’च्या शूटींगदरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं, ‘सिन्नरला एका एपिसोडचं शूटिंग करून आमच्या टीमसह आम्ही परत येत होतो. तेव्हा तुफान पाऊस सुरु झाला. सिन्नरजवळ एक सुंदर तटबंदी असलेलं दगडी मंदिर होतं. ते पाहून मी दर्शनाला खाली उतरलो. दर्शन घेऊन झाल्यावर परत येऊन गाडीत बसलो तर गाडीसमोर एक गाय येऊन आडवी थांबली. एरवी गाय रस्त्यात येते आणि हॉर्न दिला की पटदिशी पुढे जाते. मात्र ही गाय काही जागची हलेना. असं साधारण बरच वेळ झालं आणि ती दहा-एक मिनिटांनी बाजूला झाली. चला आता सिग्नल मिळाला असं गंमतीत मी म्हणलं आणि आम्ही पुढे गेलो. पुढे इतका तुफान पाऊस सुरु झाला की आम्हाला पुढचं सुद्धा दिसत नव्हतं. आमची गाडी हळूहळू चालली होती आणि समोर एक वृद्ध आजोबा हाताने इशारा करून थांबवताना दिसले. तिकडे जाऊन प्रकरण काय आहे हे विचारलं तेव्हा कळलं की पुढच्या नदीवरचा पूल पाण्याने ढासळला आणि पडला. त्यांनी आम्हाला दुस-या मार्गानं जा असं सांगितलं. नशीब बलवत्तर होतं त्यामुळे एका गायीने आमचा जीव वाचवला...’ 

त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. देव पाठीशी आहे तुमच्या, असं एकाने लिहिलं आहे. काहींनी ‘देव तारी त्याला कोण मारी,’ असं म्हटलं आहे.‘देव पाठीशी आहे तुमच्या. तुमची पुण्याई आणि देवाचा आशीर्वाद याने तुम्ही वाचलात. तुम्ही आजपर्यंत सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अनेक वहिन्याच नाही तर आणि महाराष्ट्राच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत,’अशी कमेंट एकाने केली आहे.

टॅग्स :आदेश बांदेकरहोम मिनिस्टरझी मराठीटेलिव्हिजन