क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपेनहायमर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २१ जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीनच दिवसांत ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. परंतु, एका सीनमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात वैज्ञानिक ओपेनहायमरची भूमिका साकारणारा अभिनेता सिलियन मर्फी इंटिमेट सीनदरम्यान भगवदगीतेतील एका ओळीचं वाचन करताना दिसत आहे. चित्रपटातील हा सीन व्हायरल झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीदेखील चित्रपटातील हे दृश्य काढून टाकण्यास सांगितले आहे. आता यावर महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारलेला अभिनेता नीतीश भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'ईटाइम्स'शी बोलताना नीतीश भारद्वाज यांनी या मुद्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "गीता युद्धाच्या मैदानात कर्तव्यच्या भावनांची जाणून करुन देते. आपलं आयुष्य हे अडचणींनी भरलेलं आहे. त्यामध्ये भावनिक गुंतागुंत अधिक आहे. श्लोक ११.२ मध्ये अर्जुनला एका योद्धाप्रमाणे त्याचं कर्तव्य पार पाडण्याचे उपदेश देण्यात आले आहेत. श्रीकृष्णाच्या सर्व श्लोकांचं महत्त्व आपण नीट जाणून घेतलं पाहिजे. मी सनातन आहे आणि मीच सर्वनाश करणार आहे. तू मारलं नाही तरी सगळ्यांचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे तू तुझं कर्तव्य करत राहा, असं ते म्हणतात."
‘बाईपण भारी देवा’ने २४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, केदार शिंदे म्हणाले, “सैराटनंतर...”
"ओपेनहायमरने अॅटम बॉम्ब बनवला आणि त्याचा उपयोग जपानमधील लोकांना मारण्यासाठी केला. मी माझं कर्तव्य योग्यरित्या पार पाडलं की नाही, याचा विचार तेव्हा त्याने केला होता. तेव्हा त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. ज्यातून हे स्पष्ट होतं की त्यांच्या या अविष्काराबद्दल त्यांना पश्चाताप झाला होता. त्यांच्या या संशोधनामुळे भविष्यात मानव जातीचा खात्मा होऊ शकतो, याची त्यांना जाणीव झाली होती. चित्रपटात ओपेनहायमरच्या या भावनांना योग्य पद्धतीने दाखवलं गेलं पाहिजे. ते वैज्ञानिक होते. आणि वैज्ञानिक ३६५ दिवस २४ तास विचार करत असतात. शारीरिकरित्या ते काहीही करत असले, तरी त्यांच्या मनात तेच विचार असतात," असंही त्यांनी पुढे सांगितलं.
नीतीश भारद्वाज यांनी ओपेनहायमरच्या भावनांना योग्य पद्धतीने समजून घेण्याबाबत विनंती केली आहे. "ओपेनहायमरच्या जीवनातील मह्त्त्वपूर्ण घटनांचा भावनिकरित्या विचार करण्याची मी प्रेक्षकांना विनंती करतो. आज आपण लालसेपोटी मनुष्य जातीलाच संपवायला निघालो आहोत. कुरुक्षेत्रमध्ये हीच परिस्थिती आहे," असंही पुढे ते म्हणाले.