महाभारत (Mahabharat ) या गाजलेल्या पौराणिक मालिकेत गदाधारी ‘भीम’ची (Bheem ) भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) सध्या चांगलेच संतापले आहेत. होय, कारण आहे त्यांच्याबद्दलची एक बातमी. 76 वर्षीय प्रवीण कुमार सोबती यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची बातमी नुकतीच प्रसारमाध्यमांत उमटली होती. याच बातमीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मला ना मदतीची गरज आहे, ना पैशांची, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. ‘ या वयात माझ्याबद्दल निराधार बातम्या पसरवल्या गेल्यात. यामुळे मला शेकडो फोन येत आहेत. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मी पंजाब सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या पेन्शनपासून वंचित असल्याचं म्हटलं होतं. कारण गोष्ट फक्त पेन्शनच नाही तर सन्मानाची आहे. मी एक खेळाडू होतो, म्हणून मी पेन्शनबद्दल बोललो होतो. मी कोणत्याही मदतीची मागणी केली नाही. ना मला मदत हवी, ना पैसा. मी एक सधन कुटुंब आहे. मी प्रचंड स्वाभिमानी व्यक्ती आहे, असे ते म्हणाले.
मी फक्त एका दैनिकाला मुलाखत दिली होती. पण अन्य मीडियाने माझी बाजू न ऐकता वाट्टेल ते लिहिले. यामुळे मी दु:खी आहे. माझं कुटुंबही दुखावलं आहे. मी हलाखीचं जीवन जगतोय, एकटं जगतोय, अशा बातम्या उमटल्यानंतर मला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोन आलेत. पण मला कुठलीही आर्थिक समस्या नाही. आजारी आहे. स्पाईनशी संबधित आजारामुळे चालण्या फिरण्यास अडचणी आहेत. पण मी हिंमत हरलेलो नाही. थोड्याच दिवसांत मी स्वत:च्या पायावर फिरू शकेल. मी माझी पत्नी व नोकरासोबत राहतो. माझी मुलगी व नात मला भेटायला येत जात राहतात. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. मी फक्त माझ्या अधिकाराबद्दल बोललो होतो. कॉमन वेल्थ गेम्स व एशियन गेम्समध्ये मी मेडल जिंकलं. अर्जुन पुरस्कारही जिंकला. पंजाब सरकारकडून अन्य खेळाडूंना पेन्शन दिली जाते. ती मला मिळालेली नाही, एवढंच मी म्हणालो होतां. असेही त्यांनी स्पष्ट केलं.
अमृतसर पंजाबमध्ये जन्मलेल्या प्रवीण यांनी शालेय वयापासूनच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धा जिंकल्यासुद्धा होत्या. 1966 मध्ये कॉमन वेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकलं.त्यांनतर एशियन स्पर्धेत दोन वेळा गोल्ड मेडल पटकावलं आहे.