'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. घराघरात या शोचे चाहते आहेत. या शोमुळे अनेक नवोदित कलाकरांना त्यांची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे प्रथमेश शिवलकर. अभिनय आणि कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवणारा प्रथमेश एक उत्तम लेखकही आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने महिंद्रा थार ही गाडी खरेदी केली होती. आता प्रथमेशचं घराचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.
गाडी घेतल्यानंतर प्रथमेशने आता शेतात बंगला बांधला आहे. 'शिवार्पण' असं नाव त्याने त्याच्या नव्या घराला दिलं आहे. प्रथमेशने घराचे फोटो शेअर करत खास पोस्टही लिहिली आहे. "यांजसाठी केला होता अट्टाहास भाग २:शिवार्पण. शहरापासून दूर हक्काची एक वास्तु असावी. जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी…मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण; अशीच स्वप्नातली वास्तु झाली साकार...नाव तिचे “शिवार्पण”. ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो , त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते……तेव्हा त्या वास्तुचे ऋण फ़ेडन्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच ”शिवार्पण". हक्काचं शेतघर", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रथमेशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रथमेश हास्यजत्रेत अभिनय करण्याबरोबरच स्किटचं लेखनही करतो. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.