'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. अभिनय आणि विनोदाची खुमखुमी असलेला निखिल बने हास्यजत्रेमुळेच घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत निखिल बने प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. निखिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही तो चाहत्यांना अपडेट देत असतो.
निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने चिपळूणमधील त्याच्या गावाची झलक दाखवली आहे. त्याबरोबरच गावात कार्यक्रम कसे केले जातात, हेदेखील व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या बनेने मुंबईहून ट्रेनने चिपळूण गाठल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
कोकणात गेलेल्या निखिलने पहिल्या पावासाचा अनुभवही गावी घेतल्याचं व्हिडिओत म्हटलं आहे. गावी सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर भजनातही निखिल सहभागी झाला. मुंबईत राहणाऱ्या निखिलचं गाव प्रेम काही लपून राहिलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच तो गावी जाऊन आला होता. त्याचाही व्हिडिओ त्याने शेअर केला होता. दरम्यान, निखिलने हास्यजत्रेबरोबरच सिनेमातही काम केलं आहे.