'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', 'पावनखिंड' अशा ऐतिहासिक सिनेमांमध्ये बहिर्जी नाईक ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हरीश दुधाडे. मालिका आणि नाटकांमध्ये काम करत हरीशने अभिनयाचा ठसा उमटवला. बहिर्जीबरोबरच हरीशला पोलिसाच्या भूमिकेतही चाहत्यांनी पसंत केलं. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही त्याची मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत तो विजय भोसले ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
हरीश दुधाडेच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनीही घेतली आहे. प्रजासत्ताक दिनासाठी बैस यांनी हरीश दुधाडेला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे.
हरीश दुधाडेची पोस्ट
26 जानेवरी २०२४अविस्मरणीय दिवस .
एक कलाकार म्हणून आम्हाला विविध प्रकारे कामाची पावती मिळत असते पण सरकार दरबारी जेव्हा ती नोंद घेतली जाते तेव्हा तो दिवस अविस्मरणीय ठरतो .
माननीय गवर्नर "श्री . रमेशजी बैस " यांच्या निवासस्थानी आज मला आमंत्रित केले गेले . आजवर केलेल्या अनेक भूमिकांपैकी "विजय भोसले " ही भूमिका याचे मुख्य कारण ठरली .
आपलं काम कोण कधी कुठे पहात असतं काही सांगता येत नाही . या गोष्टीवर आज खऱ्या अर्थाने विश्वास बसला .माझ्या कामाचं कौतूक केलं सन्मान केला. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद असेच कायम राहू द्या .
हरीश दुधाडेच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. हरीश दुधाडेने 'नकळत सारे घडले', 'तू सौभाग्यवती', 'सरस्वती', 'माझे मन तुझे झाले', 'तुमची मुलगी काय करते' या मालिकांमध्येही काम केलं आहे.