‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत हा शो लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यात काय घडतं हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. यामध्येच अभिनेत्री शिवाली परब हिने तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे.
शिवालीने अलिकडेच एक संकेतस्थळाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आई-वडिलांविषयी भाष्य केलं. तसंच तिचा फिल्मी प्रवास कसा सुरु झाला हेदेखील तिने सांगितलं.
" मी फार साध्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाले आहे. मी एका चाळीत रहायचे. मला याचं अजिबात दु:खं वगैरे नाहीये. आपण फक्त टीव्ही पाहात असतो. मी कधीही कोणत्याही कलाकाराला भेटले नव्हते. त्यामुळे शुटींग, सेटअप, आर्टिस्ट कसे असतात काय, याची मला अजिबातच कल्पना नव्हती. पण, मला लहानपणापासून स्टेजवर डान्स वगैरे करायची फार आवड होती ",असं शिवाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझे वडील रिक्षा चालवतात आणि आई गृहिणी आहे. ती घरी शिवणकाम करणं, माळ बनवणं अशी काम करायची. त्यामुळे माझे कुटुंबीय अगदीच मध्यमवर्गीय होते. त्यानंतर मग माझ्या आयुष्यात हास्यजत्रेची संधी आली. यामुळे खूप मोठा बदल झाला. मला हे सगळं शब्दात मांडता येणार नाही. मी हास्यजत्रेत असल्याने सर्व गोष्टी सुरळीत सुरु आहेत. आता त्यांना ही काम करावी लागत नाही. आणि हा खरंच आनंदाचा क्षण आहे”.
दरम्यान, शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाव्यतिरिक्त सिनेमातही काम केलं आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात ती झळकली होती. तसंच गेल्या काही काळापासून तिचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.