दादरमधील शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं (MNS Deepotsav) आयोजन करण्यात आलंय. शिवाजी पार्क परिसर उजळून निघाला आहे. अनेक दिग्गज मराठी कलाकारांना मनसेच्यावतीनं दीपोत्सवाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर ‘शिवतीर्थ’वर त्यांचा पाहूणचारही करण्यात आला. मनसेच्या दीपोत्सवात प्राजक्तासह मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, संतोष जुवेकर, विशाखा सुभेदार, संजय नार्वेकर, वंदना गुप्ते आदींनी शिवतीर्थावर हजेरी लावली होती.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला निखिल बनेही मनसे आयोजित दीपोत्सवात सहभागी झाला होता. यावेळी त्याने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली.
निखिल बनेची पोस्ट दोन वर्षांनंतर माझ्या आयुष्यातली दिवाळी अशी साजरी होईल अस वाटलं देखील नव्हत. शिवाजी पार्क दिपोत्सवा निमित्त राज साहेबांच्या निवासस्थानी म्हणजेच "शिवतीर्थावर" जाण्याचा योग आला. साहेबांनी आमच्या टीमशी खूप गप्पा मारल्या ते दोन तास म्हणजे एक अनुभूती होती. टीव्हीवर भाषण ऐकत, त्यांच्या भाषणांच्या चर्चा ऐकत मोठा झालो, कधीही पार्कात गेलो की "ए राज साहेब इथे राहतात ना" मित्रांमध्ये अशी कुजबूज असायची आणि आज त्याच घरी त्यांचा कुटुंबासोबत बसून काही आनंदाचे, सुखाचे क्षण घालवले.एक साधं,सरळ आणि कलाकारांवर प्रेम करणारं कुटुंब.
निखिलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय. पोस्ट शेअर करताना त्याने काही फोटो पोस्ट केलेत यात तो राज ठाकरेंच्या बाजूला उभा दिसतोय. निखिलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. जिंकलास मित्रा,नशिबवान आहेस मित्रा, खूप छान अशा कमेंट्स केल्या आहेत.