‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या शोमधील विनोदवीरांची चर्चा नेहमीच होत असते. या कार्यक्रमातील असाच एक विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी प्रसाद खांडेकरची ओळख आहे. हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. कित्येक वर्षांपासून प्रसाद चाहत्यांचं मनोरंजन करतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला.
कलाक्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात कशी काय झाली यबाबत प्रसादने एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रसाद म्हणाला, मी खरं तर क्रिकेटपटू होतो.अंडर १४साठी माझी मुंबईमधून निवड झाली होती. दहावीनंतर माझा अपघात झाला होता. यानंतर जवळपास तीन महिने माझ्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर मी माझ्या वडिलांसोबत ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे भरत जाधवचं नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला ते क्रिकेट सारखंच वाटलं कराण तुम्हाला समोरासमोर कामाची पोचपावती मिळते”. खरं तर माझ्या कुटुंबातून कोणीच याक्षेत्रात नाही पण बाबांना नाटकाची आवड होती. हळूहळू मलाही या क्षेत्राबाबत आवड निर्माण झाली. मी कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयामधून शिक्षण घेत होतो. त्यावेळी महाविद्यालयामध्ये एकांकीका हा प्रकार नव्हता. त्यात ठाकूर महाविद्यालयामध्ये फार कमी मराठी मुलं होती. मग मीच १० ते १५ मुलं जमा केली. आम्ही मराठी कलामंच नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुप अंतर्गत मी एकांकीका करू लागलो. इथूनच माझ्या अभिनयक्षेत्राला सुरुवात झाली. ‘आम्ही पाचपुते’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं”. प्रसाद सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आपल्या पत्नी व मुलासोबतचे फोटो तो सतत शेअर करत असतो.