'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) मधले सर्व कलाकार आज स्टार झाले आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. चाहत्यांनी सर्वांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. मात्र या कलाकारांना इथपर्यंत पोहचण्यासाठी मोठा स्ट्रगल करावा लागला हेही तितकंच खरं आहे. अगदी हास्यजत्रेचा भाग होण्यासाठीही त्यांना कठीण ऑडिशन द्यावी लागली. हास्यजत्रेतील असाच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap). पृथ्वीकने आपल्या जबरदस्त विनोदाच्या टायमिंगने सर्वांचे मन जिंकले. पण एक वेळ अशी होती जेव्हा त्याला कमी फॉलोअर्स म्हणून रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.
पृथ्वीकने ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'हास्यजत्रेआधी मला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे नकार पत्करावा लागला आहे. अनेकदा तर कारणंही विचित्र होती. सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्यानेही मला काम मिळालं नाही. सोशल मीडियावर एक लाखही फॉलोअर्स नाही म्हणून ही भूमिका तुला मिळू शकत नाही असं मला ऐकावं लागलं आहे. चांगलं काम करुनही अशा क्षुल्लक कारणावरुन माझ्यासोबत काही गोष्टी घडल्या आहेत.'
यानंतर पृथ्वीकची हास्यजत्रेत निवड झाली आणि त्याचं नशीबच पालटलं. सध्या तो 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेतही काम करत आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर तो आज यशस्वी झाला आहे. त्याचा हाच प्रवास त्याने मुलाखतीतून उलगडला आहे.